पीटीआय, नवी दिल्ली
ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ, हिंदी कवी गगन गिल, इंग्रजी लेखक इस्टीरीन किरे यांच्यासह २१ जणांना साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी जाहीर झाले. अकादमीच्या निवड समिती सदस्यांनी २१ भाषांमध्ये हे सन्मान जाहीर केले. कादंबरी, लघुकथा, कविता, निबंध, नाटक अशा विविध साहित्य प्रकारांमधील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. या क्रमात यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यारूप’ या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. ‘राजहंस प्रकाशन’ सलग तिसऱ्या वर्षी पुरस्काराचे मानकरी ठरले.

सुधीर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील एक व्यासंगी व परखड समीक्षक म्हणून ओळखले जातात. विविध वाङ्मयीन विषयांवरील मूलगामी आणि मूल्यवेधी अशी निर्मळ, निकोप, पारदर्शक व वस्तुनिष्ठ दृष्टी लाभलेल्या रसाळांना हा पुरस्कार मिळाल्याने साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : Amit Shah : अमित शाह यांचा आरोप, “काँग्रेसची भूमिका बाबासाहेब आंबडेकरांच्या विरोधातलीच, त्यांना भारतरत्न मिळू नये म्हणून..”

तीन कवितासंग्रह, तीन कादंबरी, दोन लघुकथा, तीन निबंध, तिघांना साहित्य समीक्षेसाठी तर प्रत्येकी एकाला नाटक व संशोधनातील योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला. कवितांसाठी के. जयकुमार (मल्याळम) हाओबम सत्यवती देवी (मणिपुरी) दिलीप झवेरी (गुजराथी) समीर टंटी (आसामी) मुकुट मनिराज (राजस्थानी) दीपक कुमार शर्मा (संस्कृत) यांचा समावेश आहे. माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखालील साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाने नावांना मान्यता दिली. शाल, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ८ मार्चला पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

साहित्यिकांचा सन्मान झाल्याची भावना

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर साहित्यिक वर्तुळामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी रसाळ यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे समीक्षकाचा व ज्येष्ठ लेखकाचा सन्मान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लेखक धनंजय गुडसूरकर यांनी डॉ. रसाळ यांचे कर्तृत्व दिशादर्शक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचा : महाराष्ट्रात NHAI चं २०३ कोटींचं नुकसान; CAG चा अहवाल लोकसभेत सादर, रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका!

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद झाला. आनंदामागचे मुख्य कारण म्हणजे मोठे समीक्षक, विचारवंत यांना आतापर्यंत हा पुरस्कार दिला गेलेला आहे. पुरस्काराचे मानकरी लक्ष्मणशास्त्री जोशी, बा. सी. मर्ढेकर, प्रभाकर पाध्ये यांच्या पंक्तीत जाऊन बसलो आहे, याचे अतिशय समाधान आहे. – डॉ. सुधीर रसाळ

सलग तिसऱ्या वर्षी ‘राजहंस’ला पुरस्कार

डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यारूप’ या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला असून, ‘राजहंस प्रकाशन’ सलग तिसऱ्या वर्षी पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. दोन वर्षांपूर्वी पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या कवितासंग्रहाला, तर गेल्या वर्षी अभय सदावर्ते यांनी अनुवादित केलेल्या ‘ब्राह्मोज’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.

Story img Loader