पीटीआय, नवी दिल्ली : विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या ‘बॅटरी’तील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लिथियम’ साठय़ाचा शोध जम्मू-काश्मीरमध्ये लागला आहे. ५.९ दशलक्ष टन लिथियम साठा सापडल्याचे सरकारने जाहीर केले आहे, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले. लिथियमसाठी भारत प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनावर अवलंबून आहे.
भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाला जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल-हैमाना भागात लिथियमचे साठे सापडल्याचे केंद्रीय खणीकर्म मंत्रालयाने जाहीर केले. कर्नाटकात २०२१ मध्ये या खनिजाचे अनेक छोटे साठे आढळले होते. नव्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ धातूंच्या पुरेशा पुरवठय़ासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देशांतर्गत आणि परदेशातील स्रोतांचा शोध सुरू आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. खणीकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज म्हणाले की कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आधीच्या उपायांना नवी दिशा दिली जात आहे.
हवामानबदलावरील उपाय म्हणून हरित उर्जेसाठी जगभरात लिथियमसारख्या दुर्मिळ धातूंची मागणी वाढली आहे. २०२३ मध्ये, चीनने बोलिव्हियाच्या विशाल लिथियम साठय़ासंदर्भात एक अब्ज डॉलर करारावर स्वाक्षरी केली. तेथे जगातील सर्वात मोठा सुमारे २१ मिलियन टन लिथियम साठा असल्याचा अंदाज आहे.
लिथियम उत्खनाने पर्यावरणाचा ऱ्हास?
जागतिक बँकेच्या मतानुसार २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ नियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खननात ५०० टक्के वाढ करणे आवश्यक आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मतानुसार लिथियमची खाणप्रक्रिया पर्यावरणास अनुकूल नाही. लिथियम हे कठीण खडक आणि भूगर्भातील जलाशयातून काढले जाते. ऑस्ट्रेलिया, चिली आणि अर्जेटिनात हे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात. खनिज उत्खननानंतर, ते जीवाश्म इंधन वापरून भाजले जाते. तसेच हे खडक काढल्यावर तेथील भूभागाला मोठमोठी भगदाडे पडतात. शिवाय, प्रक्रिया करताना मोठय़ा प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते.
इलेक्ट्रिक मोटारींना चालना
‘रिचार्जेबल ‘बॅटरी’त ‘लिथियम’ हा महत्त्वाचा घटक असतो. स्मार्टफोन, लॅपटॉप सारखी अनेक उपकरणे तसेच विजेवरील मोटारींसाठी या ‘बॅटरी’ वापरल्या जातात. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून २०३० पर्यंत खासगी ‘इलेक्ट्रिक मोटारीं’ची संख्या ३० टक्क्यांनी वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना लिथियम साठय़ाच्या शोधामुळे चालना मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
विरोध का?
लिथियम वेगळे करण्याच्या प्रक्रियेसाठी भरपूर पाणी वापरावे लागते. या प्रक्रियेतून वातावरणात मोठय़ा प्रमाणात ‘कार्बन डाय ऑक्साइड’ उत्सर्जित होतो. भूगर्भातील जलाशयांमधून ते काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. त्यापैकी बरेच साठे पाणीटंचाईग्रस्त अर्जेटिनात आढळतात. यामुळे नैसर्गिक स्रोत संपून तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने तेथील नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे.