Live-In Registration Mandatory UCC Rules : उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी संहितेचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. याअंतर्गत आता राज्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना विवाहाप्रमाणे नोंदणी करावी लागेल. यासह सर्व प्रकारच्या शासकीय नोंदण्या करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करावं लागणार आहे. जसे की मृत्यूपत्र बनवणे, आधार कार्ड बनवणे, लग्नाची नोंद करणे यामध्ये साक्षीदारांचेही व्हिडीओ रेकॉर्ड करणे अनिवार्य असेल. उत्तराखंडमधील सर्व रहिवाशांना हे नियम लागू होतील. २६ जानेवारीपासून राज्यात हे नवीन नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने तशी तयारी देखील सुरू केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने त्यांच्या अधिकाऱ्यांना यूसीसी पोर्टलची माहिती घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका प्रशिक्षण शिबिरात इंडियन एक्सप्रेसने सहभाग घेतला होता. देहरादूनमधील डोईवाला ब्लॉक कार्यालयात यासंबंधीचं प्रशिक्षण सुरू झालं आहे.
यूसीसीच्या नवी नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात तीन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देहरादूनमध्ये महत्त्वाची बैठक व प्रशिक्षण शिबीर पार पडलं. २० जानेवारीपर्यंत हे प्रशिक्षण शिबीर चालू असेल. या शिबिरात अधिकाऱ्यांना यूसीसी पोर्टलबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यूसीसी पोर्टल तीन प्रकारे चालवलं जाणार आहे. नागरिकांव्यतिरिक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी यामध्ये स्वतंत्र पर्याय असतील. या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल. या पोर्टलवर विवाह, घटस्फोट, लिव्ह इन नोंदणी, लिव्ह-इन रिलेशनशिप संपुष्टात आणणे, उत्तराधिकारी व कायदेशीर वारस घोषित करणे, मृत्यूपत्राची नोंद केली जाईल.
पोर्टलच्या माध्यमातून तक्रारही करता येणार
लग्न किंवा लिव्ह-इनबाबत कोणाची काही तक्रार असेल तर ती देखील याच पोर्टलच्या माध्यमातून करता येईल. या पोर्टलवर कोणीही चुकीची माहिती अपलोड करू नये, कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी सब-रजिस्ट्रारला तक्रारींची पडताळणी करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, या पोर्टलचं प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक मुकेश म्हणाले, “तक्रार करणाऱ्या नागरिकालाही पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. तसेच खोट्या तक्रारींवर लक्ष ठेण्याचं कामही सब-रजिस्ट्रारला सोपवण्यात आलं आहे”. सध्या राज्यात लिव्ह-इनमध्ये राहत असलेली जोडपी व आगामी काळात लिव्ह-इनमध्ये राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना पोर्टलवर त्यांचं नाव, वय, राष्ट्रीयत्व, धर्म, पूर्वीच्या नातेसंबंधाची स्थिती व फोन नंबर द्यावा लागेल. विवाह नोंदणीसाठी देखील हीच माहिती पोर्टलवर प्रविष्ट करावी लागेल.