Live In Partner Killed, Crime News Marathi: मागील वर्षी श्रद्धा वालकरच्या हत्येने हादरलेल्या दिल्लीत आता लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचं नवीन प्रकरण चर्चेत आलं आहे. गुरुग्राम येथील पालम विहार येथील एका बांधकाम साईटवर आपल्या लिव्ह-इन पार्टनरचा खून केल्याच्या आरोपाखाली एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे समजतेय. टाइम्स ऑफ इंडियाने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी (लल्लन यादव) ने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि अंजलीने रात्रीच्या जेवणात अंडी उकडण्यास नकार दिल्याने तिच्याशी वाद झाला. रागाच्या भरात लल्लनने अंजलीला हातोड्याने आणि बेल्टने मारहाण केली.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी लल्लन हा बिहारमधील मधेपुरा येथून सहा वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबाशी झालेल्या वादानंतर दिल्लीत आला होता. यापूर्वी लल्लनच्या पहिल्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. दिल्लीत येताच सहा महिन्यांपूर्वी यादवची ३२ वर्षीय अंजली हिच्याशी भेट झाली. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि ते दोघेही गुरुग्राममध्ये एकत्र राहात होते.
दरम्यान, इमारतीचे केअरटेकर सुरेंद्र यांनी पोलिसांना सांगितले की, हे जोडपे बांधकामाच्या साईटवर रहात होते. चोमा परिसरात बुधवारी याच बांधकाम साईटवर महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. अंजलीचा मृतदेह जेव्हा पोलिसांना सापडला तेव्हा यादव पळून गेला होता. त्यानंतर शुक्रवारी यादवविरुद्ध आयपीसी कलम ३०२ (हत्या) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. त्याला शनिवारी दिल्लीतील सराय काले खान परिसरातून अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सुद्धा पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा<< Video : १८ मीटर लांबीच्या, इंधन भरलेल्या रॉकेटचा प्रक्षेपण होताच स्फोट; कंपनीचे अध्यक्ष म्हणतात, आम्ही मुद्दामच ..
पोलीस अधिकारी करमजीत सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, “१० मार्च रोजी हे जोडपे दिल्लीहून गुरुग्रामला कामासाठी आले होते. त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा नसल्याने कंत्राटदाराने त्यांना बांधकामाच्या ठिकाणी राहण्याची ऑफर दिली होती. १२ आणि १३ मार्चच्या मध्यरात्री अंजली आणि यादवमध्ये जेवणावरून भांडण झाले. नंतर तिला मारहाण करून ठार मारले. अटकेच्या भीतीने यादव घटनास्थळावरून पळून गेला, मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढले. अंजलीच्या हत्येसाठी वापरलेली बसोली (हातोडा) आणि पट्टा दोन्ही गुन्ह्याच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आले आहेत.