अणु साहित्य पुरवठादार गटात (एनएसजी) भारताच्या समावेशाला एकट्या चीनचा विरोध नसून अन्य राष्ट्रांचाही विरोध असल्याचे गुरूवारी सेऊल येथे सुरू असलेल्या एनएसजी बैठकीदरम्यान समोर आले . ब्राझील, न्यूझीलंड, आयर्लंड, तुर्की या देशांनी एनपीटी कराराच्या मुद्द्यावरून भारताच्या एनएसजीमधील समावेशाला विरोध केला आहे. त्यामुळे भारताच्या एनएसजीमधील समावेशाला चीनसह पाच देशांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत मेक्सिकोने पंतप्रधान मोदींना दिलेले आश्वासन पाळत भारताच्या समावेशाला पाठिंबा दर्शविला. ब्रिक्स गटातील ब्राझीलने केलेला विरोध हा भारतासाठी अनपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. एनएसजी गटातील ४८ देशांची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून आता ती अंतिम टप्प्यात आहे. गटाचे सदस्यत्व भारताला मिळवून देण्यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे एनएसजी बैठकीसाठी दक्षिण कोरियातील सोलला रवाना झाले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्यापपर्यंत यश आलेले नाही. भारताला या गटाचे सदस्यत्व मिळण्यासाठी सर्व देशांचे एकमत होणे गरजेचे आहे. दरम्यान, या बैठकीत आत्तापर्यंत पाकिस्तानच्या एनएसजी गटातील समावेशाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. एनएसजी गटातील पाकिस्तानच्या समावेशास चीनचा पाठिंबा आहे.