झारखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. झारखंडमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये मतदारांनी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजपला विभागून कौल दिल्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर झारखंडमधील मतमोजणीचे कल सातत्याने बदलताना दिसत होते. सुरूवातीच्या काळात जोरदार मुसंडी मारणारा भाजप बहुमताचा आकडा सहज गाठेल, असे वाटत असतानाच दुपारनंतर काही आघांड्यावर भाजपची पिछेहाट झाली होती. आतापर्यंत भाजपने ४२ जागांवर विजय मिळवला असून त्यामागोमाग झामुमोचे उमेदवार १९ जागांवर विजयी झाले आहेत. तर काँग्रेस ६, झाविमो ८ आणि अन्य पक्षांना ६ जागांवर विजय मिळाला आहे.
झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी भाजप, काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा(झामुमो) आणि झारखंड विकास मोर्चा (झाविमो) या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढत रंगली होती. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपला १८, काँग्रेस १४, झामुमो १८, झाविमो ११ तर अपक्षांना पाच जागा मिळाल्या होत्या.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये सकाळपासूनच पीडीपी आणि भाजप या दोन पक्षांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू होती. मात्र, अखेर मतदारांनी भाजप आणि पीडीपीला विभागून कौल दिल्यामुळे या ठिकाणच्या विधानसभेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत २८ जागा मिळवत पीडीपी सर्वात मोठा पक्ष ठरला, तर त्यामागोमाग भाजपने २५ जागांवर विजय मिळवत सत्तेवर दावा केला. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला १५ जागांवर समाधान मानावे लागले असून, तर एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसची १२ जागांपर्यंत पिछेहाट झाली. विकासाचा मुद्दा घेऊन आक्रमक प्रचार करणाऱ्या भाजपला काश्मीरी जनतेने काही प्रमाणात स्विकारल्याचे दिसून आले. मात्र, मतदारांनी पीडीपी आणि भाजप यांना विभागून दिलेल्या कौलामुळे भाजपचे ‘४४+’ चे स्वप्न अधुरेच राहिले. त्यामुळे भाजपला आता सत्तास्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांची गरज घेणे अपरिहार्य झाले आहे.
२००८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला ११,पीडीपी २१, एनसी २८ आणि काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या.