अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे रविवारी सकाळी दिल्लीच्या पालम विमानतळावर आगमन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनैतिक शिष्टाचार बाजूला सारत ओबामांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी विमानतळावर ओबामांची गळाभेट घेतली. त्यानंतर ओबामा त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या आयटीसी मौर्या शेरटन हॉटेलकडे रवाना झाले.
तत्पूर्वी, ओबामा यांचा नियोजित आग्रा दौरा रद्द झाल्यामुळे ते मंगळवारी नवी दिल्लीतून थेट सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. मात्र, यापूर्वी रविवारी सकाळी भारतात दाखल झाल्यापासून ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र असतील. यामध्ये स्वागत समारंभ , द्विपक्षीय चर्चा, खाजगी भोजन, उद्योजकांच्या गाठीभेटी, ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग, मेजवानी समारंभ, प्रजासत्ताक दिनाचे संचलन आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानी बैठक अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. यादरम्यान, भारताच्या महत्त्वपूर्ण असलेल्या दृष्टीने नागरी अणुउर्जा कायद्याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. अणुउर्जेच्या अमेरिकन पुरवठादारांना यावेळी नरेंद्र मोदींकडून आश्वस्त केली जाण्याची शक्यता आहे. या दोन नेत्यांमधील ही अभूतपुर्व अशी भेट असेल. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक प्रश्नांविषयी चर्चा होणार असल्याचे अमेरिकन प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय, दहशतवादाविषयीच्या माहितीचे आदानप्रदान करण्याच्या मुद्द्यावरदेखील यावेळी चर्चा होऊ शकते. दोन्ही देशांचे संरक्षण सल्लागार या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा