नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूकंपातून सावरण्यासाठी प्रयत्न होत असताना तेथील भूकंपाची मालिका संपण्याचे नावचं घेत नसल्याचे चित्र आहे. नेपाळमध्ये बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी भारताची बचावकार्य करणारी टीम नेपाळमध्ये दाखल झाली असून भारतीयांना प्राधान्याने मदत होत आहे. भारत सरकारने या बचाव मोहिमेला ऑपरेशन ‘मैत्री’ असे नाव दिले आहे. तसेच अमेरिकेने नेपाळसाठी १० लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर कॅनडाने नेपाळसाठी पाच दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
सकाळी ६ वाजल्यापासून नेपाळमध्ये भूकंपाचे सहा धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता कालच्या भूकंपाइतकी नसली तरी लोकांमध्ये मात्र भीतीचे सावट आहे. रात्री उशिरापर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के सुरुच होते. पुढील ४८ तासांपर्यंत भूकंपाचे धक्के येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काठमांडूच्या वायव्येला ८० किलोमीटरवर असलेल्या लामजंग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू तेथील परिस्थिती अद्याप समजलेली नाही.
दरम्यान,नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर नेपाळ आणि भारतातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.  नेपाळमधल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २३०० च्या वर पोहचला आहे, यात ८ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.  अजूनही मोठ्या-मोठ्या इमारतीखालून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गापुढे सर्वांनीच हात जोडले असून नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी मोकळ्या पटांगणात पूर्ण रात्र जागून काढली आहे.

Story img Loader