भारताच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाचा संचलन सोहळा मोठ्या दिमाखात राजपथावर पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमर जवान ज्योतीवर शहीदांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राजपथावर देशाच्या संरक्षण दलांचे, विविधतेने नटलेल्या राज्यांच्या आणि देशातील विविध मंत्रलयांचे चित्ररथांचे भव्य संचलन झाले. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिनाच्या या नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार बनले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमच उपस्थित असलेले अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामांनी संचलन सोहळ्याचा आनंद घेतला तर, पत्नी मिशेल ओबामा देखील शिस्त आणि तालबद्ध सोहळा पाहून भारावून गेल्या.
सकाळी पावणे दहाच्या सुमारास राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या उपस्थितीत ध्वजरोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भारताच्या संरक्षण विभागाच्या तिनही दलांच्या पथकांनी प्रणव मुखर्जी यांना सलामी देत पांरपारिक शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले. यंदा संचलनात भारतातील स्त्रीशक्तीचे दर्शन घडले. राजपथावर पहिल्यांदाच महिला सैन्याच्या पथकाचे संचलन झाले तर, नौदलातील महिला अधिकाऱयांच्या पथकानेही मानवंदना दिली. तसेच हेलिकॉप्टर संचलनाचे नेतृत्व देखील यावेळी महिला अधिकाऱयाने केले. बराक ओबामांनी अतिशय उत्सुकतेने संचलनाचा अनुभव घेतला तर, पंतप्रधान मोदी संचलनादरम्यान येणाऱया प्रत्येक पथकाची माहिती ओबामांना देत होते. दुपारी बाराच्या सुमारास या सोहळ्याची सांगता झाली. लष्कराचे संचलन, विविध राज्यांचे देखाव्यांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि बीएसएफच्या जवानांनी केलेल्या साहसी कसरती. तसेच अखेरीस हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती उपस्थितांना पाहायला मिळाल्या.
दरम्यान, सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपुरस्कार प्राप्त शहीद जवानांच्या पत्नींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच राज्यांच्या चित्ररथांमध्ये यंदा तेलंगणा राज्याच्याही रथाचा समावेश होता. महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथातून यावेळी वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले होते.
राजपथावर ओबामांना भारतीय लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन
भारताच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाचा संचलन सोहळा मोठ्या दिमाखात राजपथावर पार पडला.
First published on: 26-01-2015 at 08:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live updates obama at republic day parade