महत्वाच्या मुद्द्यांवर मौन धारण केल्याची टीका होत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. धोरणनिश्चितीबाबत सातत्याने होणारी टीका, राजकारण, भ्रष्टाचार, वाढती महागाई, अर्थव्यवस्थेची वाटचाल आदी सर्व प्रश्नांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सविस्तर उत्तरे दिली.
गेल्या नऊ वर्षांत भारताचा विकासदर सर्वोच्च राहिल्याचे सांगत पंतप्रधानांनी जागतिक आर्थिक मंदीचा काहीप्रमाणात भारतावरही परिणाम झाल्याचे मान्य केले. त्याचबरोबर काँग्रेसच्या काळात अनेक महत्वाचे कायदे संमत झाल्याचे स्पष्ट करत यूपीए सरकारची विकासाच्या मुद्द्यावरून पाठराखण केली. मात्र, देशातील २जी, कोळसा घोटाळ्यांची खंत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले.
तसेच अशा घोटाळ्यांची पुनरावृत्ती होणार नाही व दोषींवर कठोर कारवाई करू असेही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत पंतप्रधान म्हणाले की, “देशात रोजगार निर्मिती करण्यात आम्ही कमी पडलो हेही मान्य, महागाई रोखण्यात काँग्रेस अपयशी ठरले. पुढील टर्मसाठी पंतप्रधानपदाची जबाबदारी मी स्विकारणार नाही. मात्र, गेल्या दहावर्षात राजीनामा द्यावा असे कधीही वाटले नाही. आपल्या आजूबाजूचे जग आव्हानात्मक बनत चालले आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे” असेही पंतप्रधान म्हणाले.
राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी सक्षम असल्याचे मतही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले. राहुल गांधी म्हटले की, देशात राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी चर्चा आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, “मला प्रामाणिकपणे वाटते की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशाचं वाटोळ होईल” असे म्हणत पंतप्रधानांनी मोदींनाही लक्ष्य केले.
मी कमकुवत पंतप्रधान नाही- मनमोहन सिंग
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून माध्यमांनी विरोधकांचीच साथ दिली असे म्हणत माध्यमांपेक्षा इतिहास माझी कारकिर्द कशी होती हे ठरवेल असेही पंतप्रधानांनी म्हटले. मी योग्यवेळी माझी भूमिका मांडत आलो आहे आणि यापुढेही योग्यते निर्णयच घेण्यात येतील त्यामुळे मौैन धारण करण्याचा मुद्दाच उपस्थित राहत नाही असे म्हणत महत्वाच्या मुद्द्यांवर मौन धारण केल्याची टीका पंतप्रधानांनी खोडून काढली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा