जंक फूड सेवन केल्याने केवळ जाडी वाढते असे नाही तर हेपिटायटिसमध्ये यकृत जसे खराब होते तसाच वाईट परिणाम होतो, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. ‘द डॉक्टर्स’ या टेलिव्हिजन कार्यक्रमात जंक फूडचा हा वाईट परिणाम होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. फास्ट फूडमुळे मानवी यकृतावर एका महिन्यातच फार विपरीत परिणाम होतो. नेहमी फास्ट फूड सेवन केल्याने यकृतावर आणखी वाईट परिणाम होतो. या फास्ट फूडमध्ये फ्राइड चिकन, अनियन रिंग्ज (कांद्याच्या फ्राइड चकत्या) तळलेले वेफर्स यांचा समावेश होतो. सीबीएस न्यूजवर द डॉक्टर्स हा कार्यक्रम सादर केला जातो, त्यात फास्ट फूडचे हे घातक परिणाम सांगण्यात आले.
डॉ. ड्रय़ू ओरडॉन यांनी सांगितले, की मेद व संपृक्त मेद यामुळे यकृतात चरबी साठत जाते. आपणच याला जबाबदार आहोत. मुले मोठय़ा प्रमाणावर फास्ट फूड सेवन करीत असतात असे दिसून येते ही दुर्दैवी बाब आहे. यकृतात फास्ट फूड सेवनामुळे जी वितंचके तयार होतात ती हेपिटायटिस मध्ये निर्माण होतात तशीच असतात. त्यामुळे कालांतराने यकृताचे काम बंद पडते. फ्रेंच फ्राइज हा सगळय़ात घातक प्रकार आहे, कारण त्यात बटाटय़ामध्ये अनेक घातक पदार्थ मिसळलेले असतात. मीठ टाकून बटाटय़ाच्या चकत्या तेलात तळणे हे तर केले जाते, पण वरून त्यात साखर टाकली जाते. कारण त्यामुळे ते कुरकुरीत होतात, पण शरीराला हे घातक आहे. त्यामुळे यकृतावर एकदा नव्हे तीनदा आघात होतो. सॅलड्समध्येही अनेक घातक रसायने वरून टाकली जातात. काही वेळा तर सॅलड्समध्ये प्रॉपलिन ग्लायकॉल टाकले जाते, कारण त्यामुळे भाज्या गोठत नाहीत, शिळय़ा होत नाहीत. या ग्लायकॉलमुळे काही फार हानी होत नाही, कारण ते थोडे टाकलेले असते असे म्हणतात, पण ते खरे नाही.