दिल्लीत दहशतवादी हल्ले घडविण्याच्या कारस्थानात सहभागी असल्याचे कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने दिल्ली न्यायालयाने हिजबुलचा संशयित दहशतवादी लियाकत शहा याला शुक्रवारी जामीन मंजूर केला.राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत लियाकत याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, असे जिल्हा न्यायाधीश आय. एस. मेहता यांनी नमूद केले. लियाकत याच्या अटकेमुळे आत्मघातकी हल्ले थोपविण्यात यश आल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. तर जम्मू-काश्मीर पोलिसांनुसार, लियाकत हा १९९०मध्ये राज्याच्या पुनर्वसन धोरणाच्या अधीन राहून पाकिस्तानातून पुन्हा भारतात परतला होता.
लियाकतच्या सांगण्यावरून जामा मशीद परिसरातील एका गेस्ट हाऊसमधून शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा हस्तगत करण्यात आल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला. मात्र हा साठा आरोपीच्या अनुपस्थितीत हस्तगत करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
कोणत्याही माहितीविना आणि आरोपीच्या अनुपस्थितीत अशा प्रकारे शोध घेणे यामुळे आरोपी दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहे, याबाबत संशयाला वाव आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
लियाकतला जामीन मंजूर करताना न्यायालयाच्या परवानगीविना देश
सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अब्दुल्ला यांच्याकडून स्वागत
हिजबुलचा संशयित दहशतवादी लियाकत शहा याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वागत केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या बाबतचा तपास लवकर पूर्ण करतील, अशी अपेक्षाही अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील सत्य उजेडात येण्यासाठी अब्दुल्ला यांनी लियाकतच्या अटकेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत करण्याची मागणी अब्दुल्ला यांनी केली.