ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं. या काळात भारत ब्रिटिशांची वसाहत होता. या भागातील जनता कारभार व्यवस्थित सांभाळू शकत नाही, असा दावा ब्रिटिशांकडून अनेकदा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य देतानाही ब्रिटिशांनी इथली लोकशाही फार काळ टिकू शकणार नाही, अशी हेटाळणीखोर टिप्पणी करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या वर्षभरात ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक आणि इतर गोंधळाच्या परिस्थितीमुळे आता ब्रिटनलाच कारभार करणं अवघड झालंय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील कॉमेडियन ट्रेव्हर नोआहचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे!
ब्रिटनमधील आर्थिक परिस्थिती आणि राजकीय हेवेदाव्यांच्या पार्श्वभूमीवर लिझ ट्रस यांना ४५ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला. ब्रिटनच्या इतिहासातील त्या सर्वात कमी कालावधीसाठी पंतप्रधानपदी राहिलेल्या व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांच्याआधी पंतप्रधान असणाऱ्या बोरीस जॉन्सन यांनाही अशाच प्रकारे पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यामुळे ब्रिटनमधील सत्ताधारी कारभार करण्यास असमर्थ ठरतायत का? असा प्रश्न खुद्द ब्रिटनसोबतच जगभरात उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रेव्हर नोआहचा हा व्हिडीओ नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
खरंतर हा व्हिडीओ २०१९चा आहे. ब्रिटननं जेव्हा ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्यावर जोरदार चर्चा सुरू होती, त्यावेळी ट्रेव्हर नोआहनं त्याच्या एका शोदरम्यान हे विधान केलं होतं. मात्र, ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ब्रिटनमधील परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली असताना हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
“या घडीला ब्रिटनमधील परिस्थिती फार वाईट झाली आहे. मला वाटतं त्यांची वसाहत असलेल्या एखाद्या जुन्या देशानं त्यांनाच वसाहत केलं पाहिजे. कारण परिस्थिती खरंच हाताबाहेर गेली आहे. त्यांना कळतच नाहीये की ते काय करत आहेत. भारतानं ब्रिटनमध्ये यावं आणि म्हणावं ‘हे बघा, आम्हाला हे करण्यात अजिबात आनंद होत नाहीये. पण तुम्हाला माहितीच नाहीये की कारभार कसा करायला हवा. आम्हाला हे सगळं हातात घेऊन व्यवस्थित करावं लागेल”, असं नोआह या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
ब्रिटनमधील आर्थिक धोरणांना मोठ्या प्रमाणावर अपयश आल्यानंतर जागतिक बाजारपेठेत ब्रिटनची आधीच खालावलेली पत आता आणखीन गर्तेत ढकलली गेल्याचं बोललं जात आहे.