अन्नधान्याच्या दरांमध्ये झालेल्या भरमसाट वाढीमुळे ब्रिटनमधील महागाई ४० वर्षांतील उच्चांकावर पोहोचली असतानाच आज ब्रिटीश जनतेला आणखीन एक धक्का बसला. ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी (भारतीय वेळेनुसार) लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला. अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. मात्र देशासमोरील आव्हानांना तोंड देत असतानाच पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. असं असतानाच आता पुन्हा एकदा सत्ताधारी हुजूर पक्षाचे खासदार आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्याकडे नेतृत्व जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अग्रलेख : आज की उद्या?

महिन्याभरताच पायउतार
सुनक यांचा पराभव करुन ट्रस या सत्तेत आल्या होत्या. गेल्या महिनाअखेरीस ट्रस यांनी मांडलेला ‘छोटा अर्थसंकल्प’ वादात सापडला. त्यानंतर त्यातील तरतुदी मागे घेण्याची नामुष्की अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांच्यावर आली. वादग्रस्त ‘छोटय़ा अर्थसंकल्पा’मधील कररचनेवर माघार घ्यावी लागत असल्याने ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी केली. यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर ट्रस या महिन्याभरताच पायउतार झाल्या आहेत.

हेही वाचा – अग्रलेख : ट्रस ‘ट्रसल्या’!

पंतप्रधानांच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात
गेल्या महिन्यात झालेली दरवाढ ही १९८०नंतरची सर्वात मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आर्थिक आणि राजकीय संकटात असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाईवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान होते. मात्र देश आर्थिक संकटात असतानाच नवनियुक्त पंतप्रधानांनी आपला पदभार सोडला आहे. सप्टेंबरमध्ये अन्नधान्याचे दर तब्बल १४.६ टक्क्यांनी वाढले आहेत. यात प्रमुख्याने कडधान्य, मटण, अंडी, पाव, दूध यामध्ये मोठी दरवाढ असल्याचे ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे महागाई निर्देशांक १०.१ टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गरीब कुटुंबे आणि निवृत्त व्यक्तींना सरकारने अधिक मदत करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. लिझ ट्रस सरकारच्या करकपातीच्या फसलेल्या प्रयोगामुळे आधीच अर्थव्यवस्थेवर ताण असताना ब्रिटनसमोर महागाईचे हे नवे संकट उभे राहिले आहे.

हेही वाचा – अग्रलेख : ‘ट्रसट्रसती’ जखम!

करकपातीचे धोरण हे केवळ श्रीमंतांच्या फायद्याचे
सत्ताधारी हुजूर पक्षाच्याच खासदारांनी ट्रस यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यांच्या काही मंत्री त्यांचा बचावासाठी पुढे सरसावले होते. मात्र त्यांना यामध्ये फारसे यश आले नाही. अवघ्या महिन्याभरापूर्वी पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या ट्रस यांची पक्षातील लोकप्रियता झपाट्याने घटली. त्यांचे करकपातीचे धोरण हे केवळ श्रीमंतांच्या फायद्याचे ठरत असून याचा मजूर पक्षालाच लाभ होत असल्याचे मत हुजूर पक्षाचे प्रतिनिधी मांडत होते. याचाच फटका ट्रस यांना बसला.

हेही वाचा – अन्यथा : या मुलाखती इथे कशा?

चुकीचा नेता निवडल्याची भावना
‘छोट्या अर्थसंकल्पातील’ कररचनेमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आली आहे. यातील बऱ्याच करसवलती मागे घेण्यात आल्या आहेत. हुजूर पक्षासाठी ही धक्कादायक घटना मानली जात आहे. ‘यू-जीओव्ही’ या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मागील आठवड्यामध्ये हुजूर पक्षाच्या ६२ टक्के सदस्यांनी चुकीचा नेता निवडल्याची भावना व्यक्त केली होती. ट्रस आणि सुनक या दोघांपैकी केवळ १५ टक्के सदस्यांना ट्रस यांची निवड योग्य वाटते असं म्हटलं होतं. ही आकडेवारी समोर आल्यामुळे पक्षात खळबळ माजली होती. तेव्हापासूनच ट्रस यांना हटवण्याबाबत खलबते सुरू होती.

अर्थमंत्र्यांना राजीनमा द्यायला लावला
दुसरीकडे अर्थमंत्री क्वारतेंग यांची ट्रस यांनीच हकालपट्टी केली. सुरूवातीला त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त होते, मात्र क्वारतेंग यांनी स्वत:च ट्विटरवर आपले राजीनामापत्र टाकले. त्यानुसार ट्रस यांनी क्वारतेंग यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये जगभरातील अर्थमंत्र्यांची बैठक अर्धवट सोडून क्वारतेंग यांनी लंडनला धाव घेतली. १० डाऊिनग स्ट्रीट येथे जाऊन ट्रस यांच्या भेटीत राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुनक समर्थकाची नियुक्ती
क्वारतेंग यांच्या जागी ट्रस यांनी जेरेमी हंट यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती जाहीर केली होती. बोरीस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर हंट स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र पुरेशी मते जमा होत नसल्यामुळे त्यांनी माघार घेऊन सुनक यांना पाठिंबा जाहीर केला होता. अर्थमंत्रीपदी सुनक समर्थकाची नियुक्ती करून हुजूर पक्षात वाढलेली दरी घटवण्याचा प्रयत्न ट्रस यांनी केल्याचे सांगितले गेले.

सुनक यांना संधी किती?
पुन्हा निवडणूका न घेता सुनक यांना थेट पंतप्रधान बनण्याची संधीही आहे. विद्यमान पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर बॅकबेंचर्स कमिटीने पाठिंबा दिल्यास ऋषी सुनक पंतप्रधान आणि पक्षांतर्गत निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले पेनी मॉर्डंट उपपंतप्रधान होऊ शकतील, मात्र सुनक यांचा अर्थखात्यातील अनुभव बघता मॉर्डंट पंतप्रधान आणि सुनक अर्थमंत्रीही होऊ शकतात असंही सांगितलं जात आहे.

बॅकबेंचर्स कमिटी कोण?
हुजूर पक्षाच्या घटनेनुसार एकदा नेता निवडल्यावर १२ महिने त्याला आव्हान देता येत नाही. मात्र ‘१९२२ बॅकबेंचर्स कमिटी’ ही पार्लमेंट सदस्यांची प्राधिकृत समितीमध्ये मतदान घेऊन नेत्याला हटवले जाऊ शकते. आगामी निवडणुकीत ट्रस यांच्या धोरणांमुळे पक्षाला फटका बसेल, याची खात्री झाली तर ही समिती त्यांना हटवू शकते असं ट्र्स यांच्याविरोधातील नाराजी समोर आल्यापासून सांगितलं जात होतं. मात्र ट्रस यांनी स्वत:च राजीनामा दिल्याने आता या समितीच्या मतानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.