एकीकडे महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला वाद दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत असताना तिकडे बिहारमध्ये कौटुंबिक कलहामुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. लोक जनशक्ती पक्षामध्ये काका-पुतण्यांमध्ये सुरू असलेल्या तुंबळ राजकीय युद्धामध्ये लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान आणि त्यांचे काका, दिवंगत रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पारस यांच्यामध्ये पक्षात उभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर आता चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साकडं घातलं आहे. “हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास मला वाटतोय”, असं चिराग पासवान म्हणाले आहेत. यामध्ये त्यांनी स्वत:ला हनुमार म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना रामाची उपमा दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता निर्णय भाजपाला घ्यायचाय!

“मी आजपर्यंत हनुमानाप्रमाणे पंतप्रधानांना प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली. आज जेव्हा हनुमानाचा राजकीय वध करण्याचा प्रयत्न होत असताना मला विश्वास आहे की अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत”, असं चिराग पासवान म्हणाले आहेत. “मी प्रत्येक मुद्द्यावर भाजपाच्या सोबत उभा राहिलो. मग तो सीएए, एनआरसीचा मुद्दा का असेना. पण नितिश कुमार यांनी त्याला विरोध केला. आता भाजपाला निर्णय घ्यायचाय की त्यांनी मला पाठिंबा द्यायचा की नितिश कुमार यांना”, असं चिराग पासवान म्हणाले.

 

राजदसोबत आघाडीचे संकेत?

“माझे वडिल आणि लालू प्रसाद यादव हे नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. राजदचे नेते तेजस्वी यादव आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आमची घट्ट मैत्री होती. ते माझे लहान बंधू आहेत. जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा आघाडीसंदर्भात पक्ष अंतिम निर्णय घेईल”, असं सांगत चिराग पासवान यांनी राजदसोबत आघाडीचे सूतोवाच देखील केले आहेत.

 

निमित्त : पासवानांचं राजकीय कुटुंब

नेमकं बिहारमध्ये घडतंय काय?

लोकजनशक्ती पार्टी हा दिवंगत रामविलास पासवान यांनी स्थापन केलेला पक्ष. या पक्षाने आधी बिहारमधील नितिशकुमार सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, मतभेदांमुळे सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला. असं करताना केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा कायम राहिलं असं देखील चिराग पासवान यांनी स्पष्ट केलं. हनुमानाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी निष्ठा वाहिल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मात्र, हा निर्णय त्यांचे काका आणि रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पासवान यांना आवडला नाही.

अडचणीच्या काळात भाजपची बघ्याची भूमिका- चिराग

दरम्यान, पशुपतीकुमार यांच्यासह बिहारमधल्या एकूण ५ खासदारांनी एकत्र येत त्यांची संसदेतील पक्षनेते पदावर निवड जाहीर केली. अर्थात, चिराग पासवान यांना पक्षनेतेपदावरून हटवल्याचं स्पष्ट केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील पशुपतीकुमार पारस यांची निवड स्वीकारून अप्रत्यक्षपणे त्यांच्या पक्षनेतेपदाला समर्थन दिलं. या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांच्या गटाने थेट संसदेतल्या या पाचही खासदारांना पक्षातून निलंबित केल्याचं पत्रक काढलं. पण त्यानंतर काही दिवसांतच पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये पशुपतीकुमार पारस यांचीच पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. पण त्यालाही पुन्हा चिराग पासवान गटानं आव्हान दिलं. या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पक्षामध्ये सुरू असलेली यादवी दिवसेंदिवस अधिकच वाढल्याचं दिसून येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ljp chirag paswan appeals prime minister narendra modi against pashupati paras in bihar politics pmw