दोनच दिवसांपूर्वी बिहारमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनी आख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. दिवंगत रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीमध्ये उभी फूट पडली. आधी पक्षाच्या ५ खासदारांनी बंडखोरी करून चिराग पासवान यांना पदावरून हटवल्याचं जाहीर केलं, नंतर चिराग पासवान यांनीच ५ बंडखोर खासदारांना पक्षातून काढल्याचं जाहीर केलं! पक्षामधल्या दोन गटांमध्ये हा वाद सुरू असताना आज पक्षाच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पारस यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. तीही बिनविरोध! त्यामुळे बिहारमधल्या या पक्षीय नाट्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.

 

नेमकं झालं काय?

लोकजनशक्ती पक्षाचे ६ खासदार लोकसभेमध्ये आहेत. त्यांचे पक्षीय नेते म्हणून याआधी चिराग पासवान यांचं नाव होतं. मात्र, नुकतंच लोकसभेतील पक्षाच्या गटानं चिराग पासवान यांच्याऐवजी पशुपतीकुमार पारस यांचं नाव पक्षीय नेते म्हणून सादर केलं. लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी पारस यांच्या नावाला मंजुरी देखील दिली. या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांना पदावरून हटवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून संतप्त झालेल्या चिराग पासवान यांच्या गटाने प्रत्युत्तर देत पशुपतीकुमार पारस यांच्यासह पाठिंबा देणाऱ्या सर्व ५ खासदारांना पक्षातून निलंबित केल्याचं पत्रक काढलं. तसेच, चिराग पासवान यांनाच सर्व अधिकार असल्याचं देखील जाहीर केलं.

बिहारमध्ये राजकीय भूकंप; लोकजनशक्ती पक्षात उभी फूट! ५ बंडखोर खासदारांची हकालपट्टी!

हे सर्व राजकीय नाट्य सुरू असताना चिराग पासवान यांनी पारस यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला. पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी चिराग पासवान गटानं बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी कटकारस्थान केल्याचा आरोप देखील केला. मात्र, आज झालेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये फासे उलटे पडले आणि चिराग पासवान यांनी निलंबित म्हणून घोषित केलेले पशुपतीकुमार पारस हेच पक्षाध्यक्ष म्हणून निवडून आले!

‘लोक जनशक्ती पक्षातील फुटीसाठी जद (यू) जबाबदार’

बिहारमध्ये नेमकं घडतंय काय?

पारस यांच्यासमोर इतर कुणीही पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे पशुपतीकुमार पारस यांची बिनविरोध पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे खुद्द पक्ष संस्थापकांच्या पुत्रालाच पक्षातील आपल्या जागेसाठी लढा देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्यास लोकसभा अध्यक्षांनी पारस यांच्या पक्षनेतेपदासाठी दिलेली मंजुरी ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकेल. बिहार सरकारमध्येच असताना चिराग पासवान यांनी नितिश कुमार यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी केंद्रातील मोदी सरकरासोबत आपण काम करत राहू, असं देखील पासवान यांनी स्पष्ट केलं होतं.