भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अचानक नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समवेतची शुक्रवारची भेट रद्द केली. भाजपच्या दबावामुळे ही भेट रद्द झाली काय याची चर्चा सुरू होती.  भाजपने या प्रकरणी सावध पवित्रा घेतला.
देशात पुन्हा आणीबाणी लादली जाऊ शकते, असे अडवाणी यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत म्हटल्यानंतर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आडवळणाने टीका असल्याची चर्चा सुरू झाली. त्या मुद्दय़ावर अडवाणी यांना केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी पाठिंबा दिला. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्दय़ावर अडवाणी यांची भेट घेण्याची इच्छा केजरीवाल यांनी व्यक्त केली होती. मात्र अडवाणी शनिवार, रविवार शहरात नसल्याने पुढच्या आठवडय़ात ही भेट होऊ शकेल असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
भाजपने मात्र ही भेट रद्द होण्यात पक्षाची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते भाजपचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी कुणाला भेटायचे हे त्यांनीच ठरवायचे आहे असे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी स्पष्ट
केले.