‘इंडियन एअरलाइन्स’च्या अपहृत विमानाच्या सुटकेसाठी १९९९मध्ये तीन दहशतवाद्यांना कंदहारला घेऊन जाण्याच्या निर्णयाबाबत तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना संपूर्ण माहिती होती, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी सांगितले.
दहशतवाद्यांना घेऊन जाण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता आणि त्यावेळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मी सांगितला होता. अडवाणी, अरुण शौरी आणि अन्य दोन मंत्र्यांनी या निर्णयाला विरोधही केला होता. त्यामुळे अडवाणी यांना या निर्णयाची पूर्णपणे माहिती होती, असे जसवंत सिंह यांनी त्यांच्या ‘इंडिया अ‍ॅट रिस्क’ या नव्या पुस्तकात लिहिले आहे. दहशतवाद्यांना घेऊन जाण्याबाबत मला काहीही माहिती नाही, असे अडवाणी यांनी नंतर सांगितले होते. मात्र त्यांना याबाबत संपूर्ण माहिती होती, याबाबत जसवंत सिंह यांनी या पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे.
‘‘त्या तीनही दहशतवाद्यांना कंदहारला घेऊन जाण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता. मी तो मंत्रिमंडळासमोर मांडला. मंत्रिमंडळाने याबाबत मला काहीही सांगितले नव्हते. तरीही मी गेलो. मात्र या वादग्रस्त निर्णयाबद्दल हरकत घेण्यासारखे काहीही नाही, असे त्यांनी या पुस्तकातून मांडले आहे.या निर्णयामुळे तुमच्यावर मोठय़ा प्रमाणात टीका करण्यात आली. त्यामुळे या निर्णयाबाबत खेद वाटतोय का, असे विचारले असता, ‘नाही, बिलकूल नाही’ असे जसवंत सिंह यांनी सांगितले. हा निर्णय घेण्यापूर्वी कोणतीही तडजोड करायची नाही, असे मला वाटत होते. मात्र त्यानंतर माझ्या विचारांमध्ये बदल झाला आणि तडजोड करण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आले, असे जसवंत सिंह यांनी सांगितले.