SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याने एका बेकरी मालकाने मनी हाईस्ट स्टाईल दरोडा टाकत १३ कोटींचं सोनं लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

कुठे घडली ही घटना?

पाच महिन्यांपूर्वी कर्नाटकातल्या दावणगिरी जिल्ह्यात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयमध्ये दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्यात बँकेतलं १७ किलो सोनं चोरण्यात आलं. या सोन्याची किंमत १३ कोटी रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी सहा जणांना अटक केली. हा दरोडा पाच महिन्यांपूर्वी पडला होता.

कर्नाटक पोलिसांनी कुणाला अटक केली?

पोलिसांनी विजय कुमार, अजय कुमार, परामनंद, अभिषेक, चंद्रू आणि मंजुनाथ अशा सहा जणांना अटक केली. अभिषेक, चंद्रू आणि मंजुनाथ दावणगिरीचे रहिवासी आहेत इतर तिघे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणाचा सूत्रधार हा विजय होता. विजयची बेकरी आणि मिठाईचं दुकान आहे. २८ ऑक्टोबर २०२४ ला या टोळीने एसबीआय बँकेतून १३ कोटींचं सोनं चोरलं.

चोरी का केली ? विजयने सांगितलं कारण

विजयला १५ लाखांचं कर्ज हवं होतं. त्याने मार्च २०२३ मध्ये कर्जासाठी अर्ज केला होता. एसबीआयने त्याचा अर्ज फेटाळला. तुझा CIBIL स्कोअर चांगला नाही म्हणून कर्जाचा अर्ज फेटाळत आहोत असं त्यांनी सांगितलं, यानंतर विजयने त्याच्या नातेवाईकाला बँकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज करण्यास सांगितलं. पण त्याचाही अर्ज बँकेने फेटाळला. यानंतर विजयचा संताप झाला, त्याने बदला घ्यायचा म्हणून बँकेवर दरोडा टाकायचं ठरवलं.

विजयने मनी हाईस्ट ही वेबसीरीज बऱ्याच वेळा पाहिली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयने मनी हाईस्ट ही स्पॅनिश वेब सीरिज अनेकदा पाहिली होती. तसंच दरोडा टाकण्यासाठी काय काय गोष्टी लागतात याचे व्हिडीओही त्याने युट्यूबवर अनेकदा पाहिले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये विजय आणि त्याच्या टोळीने हा दरोडा टाकला. मात्र या दरोड्याचा कट सहा महिने शिजत होता असंही पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी असंही सांगितलं की विजय आणि त्याच्या टोळीने अत्यंत कुशाग्रपणे या दरोड्याचा कट आखला होता. हायड्रोलिक कटर आणि गॅस सिलिंडर यांच्यासारखी साधनं त्यांनी शिवमोगातून मागवली होती. सुरहोणे येथील एका शाळेत विजय आणि त्याची टोळी जमत असे. या सगळ्यांनी सुनियोजित कट आखून त्याप्रमाणे हा दरोडा टाकला.

दरोड्याच्या दिवशी या टोळीने काय केलं?

दरोड्याच्या दिवशी विजय आणि त्याच्या टोळीने बँकेच्या खिडकीतून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या मदतीने लॉकर उघडला आणि त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. मागे त्यांनी कुठलेही पुरावे ठेवले नाहीत. तसंच त्यांनी सगळे सीसीटीव्ही कॅमेरेही काढून नेले, इतकंच नाही तर डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरही पळवला. एवढंच नाही तर आपल्या पळून जाण्याच्या मार्गावर त्यांनी मिरची पूड टाकून ठेवली होती. पोलिसांनी जर श्वान पथकाची मदत घेतली तर त्यांची दिशाभूल करण्यासाठी हे पाऊल त्यांनी उचललं होतं. विजय आणि त्याच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी जवळपास पाच महिने शोध घेतला. त्यानंतर शिताफीने विजय आणि त्याच्या साथीदारांना अटक केली.