शेतकऱयांना देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत गैरव्यवहार झाला असेल, तर दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी राज्यसभेत या विषयावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिले. 
कर्जमाफी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला. मंगळवारी कॅगचा अहवाल संसदेत सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी या विषयाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. बुधवारी संसदेचे कामकाज सुरू झाल्यावर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. शून्यकाळात राज्यसभेमध्ये रविशंकर प्रसाद यांनी कॅगच्या अहवालावर आपले मत मांडले. त्यानंतर डॉ. सिंग म्हणाले, कर्जमाफी योजनेसंदर्भातील कॅगचा अहवाल संसदेत सादर झालाय. जर योजनेच्या अंमलबजावणीत गैरव्यवहार झाला असेल, तर केंद्र सरकार दोषींविरुद्ध कडक कारवाई करेल.
तब्बल ५२ हजार कोटींच्या या कर्जमाफी योजनेअंतर्गत गरजू व पात्र शेतकऱ्यांना कर्जे नाकारतानाच नियम डावलून हजारो जणांना कर्जाची खिरापत वाटण्यात आल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे. देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) मंगळवारी संसदेत सादर केलेल्या अहवालात कृषी कर्जवाटप योजनेतील अनेक गैरप्रकारांवर प्रकाश टाकला.
केंद्रातील यूपीए-१ सरकारने मे २००८ मध्ये १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००७ दरम्यान शेतीसाठी कर्ज घेतलेल्या देशातील ३.६९ कोटी अल्प भूधारक तसेच ६० लाख अन्य शेतकऱ्यांची कृषीकर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेतून सुमारे ३ कोटी ४५ लाख शेतकऱ्यांची ५२ हजार कोटी रुपयांची कर्जे पुढच्या चार वर्षांमध्ये माफ करण्यात आली. कॅगने एप्रिल २०११ ते मार्च २०१२ दरम्यान २५ राज्यांच्या ९२ जिल्ह्यांतील ७१५ वित्त संस्थांमध्ये जाऊन ९० हजार ५७६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांचा आढावा घेतला. या नमुन्यातील ८०,२९९ शेतकऱ्यांच्या खात्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, तर ९,३३४ शेतकऱ्यांनी संबंधित कालावधीत कृषी कर्जे घेऊनही त्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली नाही. त्यांच्यापैकी १,२५७ शेतकरी पात्र होते. पण कर्जमाफीची यादी तयार करताना त्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला नव्हता. या संबंधात ९४३ तक्रारी दाखल करण्यात आल्या. उरलेल्या ८०,२९९ प्रकरणांपैकी ८.५ टक्के लाभार्थी कर्जमाफीसाठी अपात्र असल्याचा निष्कर्ष कॅगने काढला आहे. अशा शेतकऱ्यांना २०.५० कोटींची कर्जमाफी मिळाल्याचे कॅगने निदर्शनास आणून दिले आहे. एकंदरीत तब्बल २२.३२ टक्के कर्जमाफीच्या प्रकरणांमध्ये गंभीर चुका झाल्याचा निष्कर्ष कॅगने काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील त्रुटींसाठी कॅगने वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाला जबाबदार ठरविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा