भाजपने सलग दोन दिवस सरकारला धारेवर धरल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या विशेष दलाने पाच भारतीय जवानांची हत्या केल्याचा निर्वाळा गुरुवारी लोकसभेत संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांना देणे भाग पडले. अँटनी यांनी आपली चूक मान्य करून ती सुधारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी आनंद व्यक्त केला. हा मुद्दा आता भाजपसाठी संपला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी लोकसभेत केलेल्या निवेदनात अँटनी यांनी पाकिस्तानी सैन्याच्या गणवेशातील दहशतवाद्यांनी पाच भारतीय जवानांची हत्या केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानला संशयाचा फायदा देणाऱ्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेत अँटनी तसेच यूपीए सरकारची कोंडी केली होती. परिणामी, अँटनी यांना नव्याने निवेदन करणे भाग पडले. आपले विधान उपलब्ध माहितीवर आधारित असल्याचा दावा करीत अँटनी यांनी हल्ल्यासाठी पाकिस्तानी सैन्यातील विशेष दलाला जबाबदार ठरविले. लष्करप्रमुख विक्रम सिंग यांनी या घटनेनंतर पूंछ भागाचा दौरा केला आणि माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी सैन्याचे समर्थन, साह्य़ आणि सुविधेशिवाय तसेच त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय पाकिस्तानकडून काहीही होऊ शकत नाही, असे वक्तव्य अँटनी यांनी केले. मंगळवारची घटना आणि वर्षांरंभी दोन सैनिकांच्या निर्घृण हत्येसाठी जबाबदार पाकिस्तानातील लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे, पाकमधील दहशतवाद्यांचे जाळे, संघटना आणि पायाभूत सोयींना ध्वस्त करण्यासाठी कारवाई व्हायला हवी आणि मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यास जबाबदार ठरलेल्या लोकांना तातडीने शिक्षा देण्यासाठी प्रतिबद्धता दाखवायला हवी, अशी मागणी करून मंगळवारच्या चुकीचे प्रायश्चित्त करण्याचा अँटनी यांनी प्रयत्न केला.
शरीफ-मनमोहन चर्चा नक्की
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने केलेल्या आगळिकीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात तातडीने वरिष्ठ लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन चर्चा केली. नियंत्रण रेषेवर झालेल्या प्रकाराबद्दल शरीफ यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पुढील महिन्यात न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान भेटण्याची इच्छा व्यक्त केली .

Story img Loader