संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ * पंतप्रधानांची शिष्टाईही निष्फळ
पूँछ येथे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याविषयी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी संसदेत केलेल्या निवेदनावरून विरोधकांनी बुधवारी सरकारला धारेवर धरले. संरक्षणमंत्र्यांनी निवेदनात वस्तुस्थिती दडवल्याचा आरोप करत प्रमुख भाजपने संसदेचे कामकाज ठप्प पाडले. अँटनी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षाने केली. सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतही विरोधकांनी आक्रमकपणा कायम ठेवला.

 संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी पाकिस्तानी हल्ल्याबाबत संसदते दिलेले निवेदन व संरक्षण मंत्रालयाने केलेले निवेदन यांच्यात तफावत आढळल्याचा मुद्दा भाजपने संसदेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला.

  पाकिस्तानी सैन्याच्या वेषात दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून भारतीय सैनिकांवर हल्ला चढविल्याच्या अँटनी यांच्या विधानाचा भाजप नेत्यांनी खरपूस समाचार घेतला. भारतावर झालेल्या कोणत्याही सीमापार हल्ल्यात आपल्या सैनिकांचा हात नसल्याचा दावा पाकिस्तान करीत असतो. तशातच अँटनी यांनी असे विधान करणे म्हणजे पाकिस्तानला बचाव करण्याची संधी देण्यासारखे आहे. त्यामुळे केलेल्या विधानाविषयी अँटनी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. विरोधकांच्या आक्रमतेमुळे संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले. 

दरम्यान, विरोधकांची समजूत काढण्यासाठी सायंकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि राजनाथ सिंह उपस्थित होते. मात्र, पंतप्रधानांची शिष्टाईही निष्फळच ठरली. सीमेपलीकडून भारतीय जवानांवर सतत हल्ले होत असताना पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही. पाकिस्तानविषयी आमची भूमिका मवाळ असल्याचे त्यातून ध्वनित होते, अशी टीका भाजप नेत्यांनी यावेळी  केली. अँटनींनी माफी मागावी, या मागणीचा पुनरुच्चार भाजप नेत्यांनी पंतप्रधानांकडे केला.

काँग्रेस ठाम
विरोधक अँटनी यांच्या विधानाचा विपर्यास करून या मुद्दय़ावर राजकारण करत असल्याची सारवासारव काँग्रेसने केली. या मुद्यावरून भाजप राजकारण करीत असून अँटनी माफी मागणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल यशवंत सिन्हा यांनी अँटनी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. पण अँटनी यांनी निवेदन करताना उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे हे विधान केल्यामुळे त्यांनी कुणाचीही दिशाभूल केलेली नाही, अशा शब्दात कमलनाथ यांनी अँटनी यांचा बचाव केला.

 तरीही पाकिस्तानशी चर्चा सुरूच राहणार
भारतीय हद्दीत घुसून पाकिस्तानी लष्कराने केलेल्या आगळिकीवरून संसदेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात जुंपलेली असतानाच पाकिस्तानी लष्कराने बुधवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत ऊरी भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करी तुकडय़ांवर गोळीबार केला. भारतानेही त्यास चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने तब्बल एक तास गोळीबार सुरू होता. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाकिस्तानच्या आगळिकीनंतरही द्विपक्षीय चर्चा सुरूच राहील, असे बुधवारी भारताकडून स्पष्ट करण्यात आले. दोन्ही देशांमधील सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यात येतील. युद्ध पुकारून हे प्रश्न सोडविता येणार नाहीत, तर चर्चेद्वारेच प्रश्न सोडविता येतील, असे काँग्रेसचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी स्पष्ट केले.

 चर्चेला रा. स्व. संघाचा विरोध
पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या कृत्याला ‘अघोरी कृत्य’ असे संबोधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यूपीए शासनावर जोरदार शरसंधान केल़े  तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानी सैन्यावर पूर्ण नियंत्रण असल्याचा विश्वास दाखवीत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेत संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी जाणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्याशी चर्चा करू नये, अशीही मागणी संघाने केली आह़े पाकिस्तानी लष्कर भारतात घुसून भारतीय लष्कराची कत्तल करीत असताना पाकिस्तानशी चर्चा करणे हे खुळचटपणाचे आह़े  पाकिस्तान भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याबाबत गंभीर आहे, हे भारतीयांसमोर सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानला पुरेसे प्रयत्न करून दे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी म्हटल़े

शोकाकुल परिवारांचा संताप
हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीने बुधवारी बिहार सरकारने देऊ केलेली मदत नाकारली आहे. मला कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई नको, पाकिस्तानविरोधात कठोर लष्करी कारवाई करा, असा आक्रोश विजय राय या शहीद जवानाची पत्नी पुष्पा राय हिने केला. बुधवारी रात्री उशिरा सर्व शहिदांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले. शहीद झालेल्या जवानांपैकी विजयकुमार राय हे पाटण्याच्या ग्रामीण या भागातील आहेत. शंभुशरण सिंग हे भोजपूर जिल्हय़ातील, तर प्रेमनाथ सिंग व रघुनंदन प्रसाद हे सारण जिल्हय़ातील आहेत. या जवानांच्या बलिदानानंतर स्थानिक नागरिकांत संतापाची भावना असून पाकिस्तानच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले जावे, अशी त्यांची भावना आहे. दरम्यान, लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी बुधवारी जम्मूचा दौरा करून पँूछमधील परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू विमानतळावर त्यांनी शहिदांच्या पार्थिवाला आदरांजलीही वाहिली. तेथून ते दिल्लीला रवाना झाले.

माने कुटुंबाला १० लाखांची मदतमुंबई : पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे कुंडलिक माने यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी जाहीर केली. माने यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री सुरेश धस यांनी मंगळवारी जाहीर केले होते. पण बिहार सरकारने दहा लाखांची मदत जाहीर केल्याने राज्य शासनानेही तेवढीच मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader