पूंछमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पूंछमधील घटनेबद्दल संरक्षणमंत्री ए. के. अॅंटनी यांनी संसदेत केलेल्या निवेदनाबद्दल त्यांनी सभागृहाची माफी मागितलीच पाहिजे, या मागणीवर भाजप ठाम असल्याचे यावेळी पंतप्रधानांना सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बैठकीमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी, पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली आदी सहभागी झाले होते. पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर अॅंटनी यांनी संसदेमध्ये केलेले निवेदन आणि त्यापूर्वी भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तफावत असल्याकडे भाजपच्या नेत्यांनी बुधवारी संसदेचे लक्ष वेधले. भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी पूंछमधील सरला छावणी हल्ला केल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर अॅंटनी यांनी संसदेमध्ये केलेल्या निवेदनात पाकिस्तानी लष्कराने हा हल्ला केल्याची माहिती काढून टाकण्यात आली आणि पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा