स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता एका वाळू माफियाने रोखून धरल्यामुळे लोकांना नाईलाजास्तव तुडूंब भरलेल्या तलावातून अंत्ययात्रा न्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील पनागरमध्ये घडली आहे. स्थानिक गावकऱ्यांनी याप्रकरणी रोष व्यक्त केल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून आता या सगळ्याची चौकशी सुरू झाली आहे. लोकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून या समस्येची दखल घेतली जात नव्हती.
ग्णवाहिकेअभावी मृतदेहाचे गाठोडे करून नेण्याची वेळ
ब्रह्मनौदा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बिहर गावात स्मशानभूमीची वाट तलावाच्या काठावरून जाते. मात्र, अलीकडेच झालेल्या तलावाचे खोलीकरण  व रूंदीकरणाच्या कामामुळे ही वाट पाण्याखाली गेली आहे. याठिकाणी चार फूट खोल पाणी आहे. त्यामुळे स्मशानाकडे जाण्यासाठी नलिन शर्मा या वाळू माफियाच्या मालकीच्या जमिनीतून जाण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र, नलिन शर्माने आपल्या हद्दीतून जाण्यास नकार दिल्याने लोकांना पाण्यातूनच अंत्ययात्रा काढावी लागली. सूत्रांच्या माहितीनुसार ७० वर्षीय कांतिबाई पटेल यांचे गुरूवारी निधन झाले. नातेवाईक आणि गावकऱ्यांकडून काढण्यात आलेली त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीच्या दिशेने जात होती. मात्र, तलावाजवळची वाट पाण्याखाली गेल्याने लोकांनी नलिन शर्मा यांच्या जागेतून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नलिन यांनी आपल्या हद्दीतून अंत्ययात्रा नेण्यास नकार दिला. अखेर नाईलाजाने गावकरी तळ्याच्या चार फूट पाण्यात उतरले आणि स्मशानभूमी गाठली.
स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ओडिशामध्ये एका पतीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून तब्बल १२ किलोमीटरपर्यंत वाहून न्यावा लागल्याची घटना ताजी असतानाच समाजाच्या संवेदनशीलतेवर आणि सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Story img Loader