बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या करोनाच्या संक्रमणावरून पाटणा उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर बिहार सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणी केली आहे. सोमवारी न्यायालयाने लॉकडाउन संदर्भात राज्य सरकारला विचारणा केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करत लॉकडाउनच्या संदर्भात माहिती दिली आहे.

“सहकारी मंत्री व अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर १५ मे २०२१ पर्यंत बिहारमध्ये लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना व इतर कामांच्या संदर्भात आज आपत्कालीन व्यवस्थापन गटाला सूचना करण्यात आल्या आहेत”, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

करोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांबाबत सोमवारी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारला लॉकडाउन संदर्भात प्रश्न विचारला होता. उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य सरकारशी बोलण्यास सांगितले होते. ४ मे पर्यंत लॉकडाउनाबाबत कोणताही निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालय कठोर निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले होते.

करोना रुग्णांच्या उपचाराबाबत दाखल केलेल्या याचिकेवरुन न्यायालयाने राज्य सरकारवर टीका केली होती. बिहारमध्ये करोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी वॉर रुम ही नसल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही करोना रूग्णांच्या उपचाराच्या सुविधांमध्ये वाढ झालेली नसल्याचे न्यायालयाने सांगितले.

Story img Loader