गेल्या वर्षी म्हणजेच २०२०मध्ये संपूर्ण देशानं कडकडीत लॉकडाऊनचा अनुभव घेतला आहे. या काळामध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आलं होतं. या काळामध्ये रेल्वेकडून विशेष सेवा म्हणून अनेक फेऱ्या चालवण्यात आल्या. ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी देखील रेल्वे सेवा सुरू होती. लॉकडाऊनमध्येच गेलेल्या गेल्या वर्षभरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आता केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देशभरातल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचं कौतुक करतानाच रेल्वेनं लॉकडाऊन असतानाही दिलेल्या सेवेबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्या जिद्दीमुळेच हे शक्य झालं!

या पत्रात पियुष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप टाकली. “कोविड-१९ च्या काळात आपल्या रेल्वेनं देशाच्या सेवेसाठी स्वत:ला झोकून दिलं. जेव्हा सारं जग थांबलं होतं, तेव्हा तुम्ही एकही दिवसाची सुटी न घेता अर्थव्यवस्था चालती ठेवण्यासाठी अतिजोखमीच्या वातावरणात काम करत राहिलात. तुमच्यामुळेच आपण करोना काळातही देशभरात जीवनावश्यक गोष्टींचा अविरत पुरवठा करू शकलो”, असं गोयल यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

 

६३ लाख नागरिकांचं स्थलांतर!

“करोना काळात देशभरात अडकलेल्या तब्बल ६३ लाख नागरिकांची पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याचं काम आपण केलं. यासाठी आपण ४ हजार ६२१ श्रमिक स्पेशल ट्रेन देखील चालवल्या. ३७० मोठी कामं आपण पूर्ण केली. शेतकऱ्यांचा माल थेट बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी किसान रेल सर्विसनं मोठा वाटा उचलला आहे. यातून तुम्हा लाखो देशवासीयांच्या मनात स्थान मिळवलं आहे”, असं म्हणत गोयल यांनी पत्रातून रेल्वे कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.

शेवटी या सर्व कर्मचाऱ्याचे आभार देखील रेल्वेमंत्र्यांनी मानले आहेत. “तुमची निष्ठा आणि जबरदस्त कामगिरीसाठी मी तुमचे आभार मानतो. या आत्मविश्वासाने भारलेल्या टीमसोबत आपण अजून अनेक विक्रम मोडणार आहोत, मोठमोठी लक्ष्य गाठणार आहोत, इतरांसमोर आदर्श ठेवणार आहोत आणि भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणार आहोत”, असं गोयल यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.