देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्य करोनाच्या संकटाला तोंड देत असून, आरोग्य व्यवस्था बिकट स्थितीतून जात आहे. बेडसह इतर सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यांनी आता निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. हरयाणाच्या आरोग्य मंत्र्यांनी कडक निर्बंधांचं समर्थन केलं असून, लोकांच्या रोषाला सामोरं जाण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अनिल वीज यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी कडक निर्बंधांबद्दल भूमिका मांडली. “आम्ही लॉकडाउन करण्याच्या समर्थनार्थ नाहीत. जेव्हा निर्बंध लादण्यात येतात, तेव्हा लोकांचा रोष उफाळून येतो. पण, लोकांच्या रोषाबद्दल माझी तक्रार नाही पण मला लोकांच्या मृतदेहांचे ढिग बघायचे नाहीत. देशातील इतर भागाप्रमाणेच हरयाणातही करोनाचा उद्रेक झाल्याचं दिसत आहे. राज्यात ३८ हजार रुग्ण उपचार घेत असून, वेळेत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत,” असं आरोग्यमंत्री वीज म्हणाले.
“आम्ही ११ हजार विलगीकरण बेड सज्ज ठेवले आहेत. २ हजार आयसीयू बेड आणि १ हजार व्हेंटिलेटर्स बेड तयार करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडे मास्क, पीपीई किट्स, औषधांचा साठा आणि रेमडेसिवीरही उपलब्ध आहे. मागच्या लाटेत आलेल्या अनुभवांचा वापर आम्ही करत आहोत. दुसऱ्या लाटेत विषाणू प्रचंड वेगानं फैलावत आहे, पण आम्ही व्यवस्था करत आहोत,” असंही वीज म्हणाले.
“वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महामारी कायद्याखाली अधिकाधिक रुग्णालये ताब्यात घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास प्रशासनाकडून धर्मशाळा आणि शाळांचं रुपांतरही हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. जेव्हा करोना संक्रमणाला सुरुवात झाली, तेव्हा आमच्याकडे एकही प्रयोगशाळा नव्हती. आता आमच्याकडे १,८०० शासकीय प्रयोगशाळा आहेत. आम्ही दिवसाला ६२ हजार चाचण्या करू शकतो. आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी लोकांना एका दिवसापेक्षा जास्त काळ वाट बघावी लागत नसेल, असं मला वाटतं,” असंही वीज यांनी सांगितलं.