Crime News : रेल्वेने प्रवास करताना अनेक जण चालत्या गाडीतून कचरा बाहेर फेकताना दिसतात. पण असे करणे कोणाच्यातरी जीव घेऊ शकतो याचा विचार केला जात नाही. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १४ मार्च रोजी १४ वर्षीय बादल सिंह गोडठाकर याचा धावत्या रेल्वेमधून टाकलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हा मुलगा सापर-वरावल भागात रेल्वे रुळांच्या जवळ थांबला होता तेव्हा चालत्या ट्रेनमधून फेकलेली पाण्याच्या बाटलीने छातीत मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही पाण्याची बाटली थेट त्याच्या छातीत लागली आणि त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.

१ एप्रिल रोजी बादल याचे वडील संतोष सिंह यांनी एक औपचारिक तक्रार शपर वरावल पोलीस ठाण्यात दाखल केली, यामध्ये घटनेच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. यानंतर ही घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ज्यामध्ये ही बाटली नेमकी कुठून फेकण्यात आली याबद्दल माहिती समोर आली.

तपासात समोर आले की ही बाटली सहाय्यक लोको पायलट शिवराम गुर्जर याने रेल्वेबाहेर फेकली होती, जो घटना घडली तेव्हा जेतलसर जंक्शनवर पहिल्या डब्यात ट्रेनच्या लोको पायलटबरोबर प्रवास करत होता.

चौकशीनंतर ३१ वर्षीय शिवराम गुर्जरने बाटली फेकल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०६(१) अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.