महागाई आणि रेल्वे भाडेवाढीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोमवारी पहिलाच दिवस आहे. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ज्या नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली नव्हती, त्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गोंधळातच पेट्रोलियम मंत्रालयाशी निगडीत काही प्रश्नांवर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तरे दिली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी घोषणाबाजी करणाऱया सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. प्रश्नोत्तराचा तास झाल्यावर विरोधकांनी दिलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्याबद्दल विचार केला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिल्यानंतरही विरोधक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केले. बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावर गोंधळ सुरुच राहिल्याने पुन्हा दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

Story img Loader