केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या मुद्द्यावरून सोमवारी संसद अधिवेशनाच्या दुसऱया सत्राच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी सभागृहाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गिरीराज सिंह यांनी सभागृहाची माफी मागितली आणि या विषयावर पडदा पडला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी या विषयावरून स्थगन प्रस्ताव दिला होता. तो नाकारत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी शिंदे यांना बोलण्याची संधी दिली. ते म्हणाले, गिरीराज सिंह यांनी आमच्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल केलेले वक्तव्य अशोभनीय आणि आक्षेपार्ह आहे. त्यांनी आणि मोदी यांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे. गिरीराज सिंह यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये नायजेरिया या देशाचा उल्लेख केल्यामुळे त्या देशानेसुद्धा भारत सरकारकडे माफी मागण्याची मागणी केली आहे. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्या सांगत वादग्रस्त विधान केले असल्याचे शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंत्र्याने केलेले वक्तव्य निश्चितच आक्षेपार्ह आहे. त्याचे समर्थन कधीच करता येणार नाही, असे सांगितले. त्याचवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये पंतप्रधानांना ओढू नये, असेही मत त्यांनी मांडले.

Story img Loader