जम्मूमधील किश्तवार आणि लगतच्या जिल्ह्यांतील हिंसाचार, वेगळा तेलंगणा, केरळमधील सौर घोटाळा आणि हरियाणातील सनदी अधिकारी अशोक खेमका यांनी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर ठेवलेला ठपका या सर्वांमुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी सकाळी गोंधळातच सुरू झाले आणि गोंधळामुळेच लोकसभा दिवसभर सातत्याने तहकूब करावी लागली.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर नुकत्यात दिवंगत झालेल्या संसदेच्या माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतरच लगेचच डाव्या पक्षांच्या सदस्यांनी केरळमधील सौर घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी वढेरा यांच्यावर खेमका यांनी ठेवलेला ठपक्यांचा विषय उपस्थित केला. कॉंग्रेसच्या सदस्यांनी वेगळ्या तेलंगणाला विरोध करून घोषणा देण्यास सुरूवात केली. भाजपच्या सदस्यांनी किश्तवारमधील हिंसाचाराचा मुद्दाही लावून धरला. या सगळ्यामुळे लोकसभेचे कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी दोन वाजता कामकाज सुरू झाल्यावर गोंधळ सुरूच राहिल्याने पुन्हा तासाभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. तीन वाजताही सदस्यांचा गोंधळ कायम राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेतही याच विषयांवरून सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १५ मिनिटांसाठी आणि नंतर १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बारा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा एकदा गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज ३० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा