लोकसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी आमने-सामने आल्याने मोठा वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसहित इतर महिला खासदारांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र यामुळे काही काळासाठी सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेलं वादग्रस्त विधान या वादासाठी कारणीभूत ठरलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केल्याने भाजपा खासदारांकडून लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या जात होत्या. १२ वाजता सभागृह स्थगित करण्यात आल्यानंतरही भाजपा खासदार घोषणा देत सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
गोंधळ सुरु असताना सोनिया गांधी भाजपा नेत्या रमादेवी यांच्याजवळ गेल्या आणि अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली असल्याचं सांगितलं. “माझं नाव का घेतलं जात आहे?”, अशी विचारणाही त्यांनी केली.
सोनिया गांधी आणि रमादेवी यांच्यात संभाषण सुरु असताना स्मृती इराणी यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी नाही तर आपण नाव घेतलं असल्याचं म्हटलं. यावर सोनिया गांधी यांनी त्यांना ‘माझ्याशी बोलू नका’ असं सुनावलं. यानतंर दोघींमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. तब्बल दोन ते तीन मिनिटं हा वाद सुरु होता.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, भाजपाचे प्रल्हाद जोशी आणि अर्जुन मेघवाल यांनी मध्यस्थी केली. काँग्रेसच्या खासदार गीता कोरा आणि ज्योत्स्ना महंत यांनी स्मृती इराणी तसंच भाजपाच्या काही पुरुष खासदारांना सोनिया गांधींशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे भाजपाच्या महिला खासदार काँग्रेस अध्यक्षांविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. भाजपाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीर रंजन चौधऱींच्या वक्तव्यावर सोनिया गांधींनी माफी मागण्याची मागणी कायम असणार आहे.