बाळासाहेब जवळकर, पिंपरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मितभाषी, अभ्यासू आणि क्रीडाप्रेमी अशी खासदार श्रीरंग बारणे यांची राजकारणाव्यतिरिक्तची ओळख आहे. अप्पा म्हणून सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या बारणे यांचा राजकीय प्रवास २५ वर्षांचा आहे. या कालावधीत त्यांनी आठ वेळा निवडणुका लढवल्या. त्यापैकी एक विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी ते विजयी झाले आहेत.

थेरगावातील बारणे घराणे हे पिंपरी-चिंचवडच्या भूमीपुत्रांपैकी एक असे घराणे आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या बारणे यांचे पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्य़ात नात्यागोत्यांचे मोठे जाळे आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के हे श्रीरंग बारणे यांचे मेहुणे आहेत. तर, दौंडचे आमदार राहुल कुल यांचा परिवार बारणेंच्या जवळच्या नातेसंबंधातील आहे. बारणे यांचा मित्र परिवारही मोठा आहे. श्रीरंग यांचे मोठे बंधू हिरामण बारणे यांनी पिंपरी पालिकेचे नगरसेवक तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. हिरामण बारणे यांचे ज्येष्ठ पुत्र महेश व्यावसायिक असून द्वितीय पुत्र नीलेश बारणे सध्या नगरसेवक आहेत. श्रीरंग बारणे यांना विश्वजित आणि प्रताप हे दोन पुत्र आहेत. त्यांनी यंदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात सहभाग घेतल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या काळात वीट कारखानदार म्हणून परिचित असणारे बारणे अलीकडेच बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपाला आले आहेत.

श्रीरंग बारणे १९९७ मध्ये सर्वप्रथम पिंपरी पालिकेवर निवडून आले. त्यानंतर, २०१२ पर्यंत ते सातत्याने पालिकेवर निवडून येत राहिले. या कालावधीत त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले. २००९ मध्ये त्यांनी चिंचवड विधानसभा लढवली. मात्र, त्यांना अपयश आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली, तेव्हा ते नगरसेवकपदावरून थेट खासदार झाले. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ते पुन्हा मोठय़ा मताधिक्याने निवडून आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 maval election results 2019 shiv sena shrirang barne