ज्या विदर्भाने भाजपाला भरभरून दिले त्याच विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना भाजपाने वाऱ्यावर सोडले, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी मुंडे रविवारी येथे आले होते. मतदारसंघात विविध ठिकाणी ४ सभांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार मधुकर कुकडे व पदाधिकारी उपस्थित होते.
मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते, धान उत्पादनाला इतका तरी भाव मिळाला का ? असा सवाल मुंडे यांनी केला. विदर्भातील सभेत मोदी यांनी पवार साहेबांवर केलेल्या टीकेचाही धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आदरणीय शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. देशाच्या पंतप्रधानांना इतके खोटे बोलणे शोभत नाही, कर्जमाफी कुणी दिली? आयात करणारा देश निर्यात करणारा कसा झाला? पवार साहेबांच्या घरावर टीका करणाऱ्यांनी हे ध्यानात असू द्यावे असा इशारा त्यांनी दिला.
देशाचे पंतप्रधान विकासावर बोलत नाहीत, यांची भाषा आकसाची आहे. याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू असे काही बरळत असतात. सत्तांतर होऊ द्या या देशातील दोन प्रमुख दाढीवाले जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी जनता तुमचीच घरी जाण्याची वाट पाहत आहे असे मुंडे म्हणाले.
देशभरातील शेतकऱ्यांप्रमाणे इथल्या विदर्भातील धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचीही या सरकारने फसवणूक केली. परिणामी पोटनिवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपाला धडा शिकवला. भाजपविरोधातील रोष दिसून आला. मेरा देश बदल रहा है याची ही प्रचिती आहे. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत ते कायम ठेवा असे आवाहन त्यांनी केले.