शिरुर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात शरद पवार यांचा हात पकडून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा धागा पकडत शरद पवार यांनी ‘बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात शरद पवार यांची करंगळी पकडून राजकारणात आलो असे विधान केले होते. त्या विधानानंतर आता मला या वाक्याची भीती वाटते. पंतप्रधान संसदेत भेटतात तेव्हा ते हात पुढे करतात. पण माझ्या करंगळीचे काय होईल, या भीतीने हातात हात देण्याऐवजी कोणाशी ही हात मिळवत नाही. त्यामुळे आता माझ्या बोटाची चिंता वाटते. आता थेट हात जोडून नमस्कार करतो,’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, ‘देशात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने अनेक आश्वासने दिली. पण ही आश्वासन पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा विरोधात अनेक ठिकाणी प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. तर ज्या ज्या वेळी देशात भाजपा सरकार आले. तेव्हा देशावर हल्ले झाले आहेत,’ अशा शब्दात सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली.
‘देशामध्ये आज वेगळी स्थिती आहे. हे पाहून आजचे सत्ताधारी यापुढे निवडणूक होणार नाही. यासाठी प्रयत्न करीत आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. काही जण सांगतात की, ही शेवटीची निवडणूक आहे. पण हे मला मान्य नाही.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
मोदी हे वागण बर नव्ह : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात सभा घेतली. त्यावेळी आमच्या घराला त्यांनी लक्ष केले. माझ्या घराची चिंता त्यांना पडली आहे. त्यांना काय माहीत माझ्या मुलीचे लग्न झाले आहे. तुम्हाला घरचा काय अनुभव आहे का, असा सवाल उपस्थित करीत मोदी हे वागणं बरं नव्हे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. तर निवडणुकीनंतर ते काही राहत नाही. देशात वातावरण बदल असल्याचे त्यांनी सांगितले.