संतोष प्रधान, लोकसत्ता
तमिळनाडूत १९६७ पासून म्हणजेच गेल्या पाच दशकांपेक्षा अधिक काळ द्रमुक वा अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षांचाच पगडा कायम राहिला आहे. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूत यशासाठी जोर लावला आहे. यासाठी त्यांचे अलीकडच्या काळात राज्यात सातत्याने दौरे झाले. द्रविडी संस्कृतीला शह देण्यासाठी सनातन धर्मासारखे मुद्दे उपस्थित करीत हिंदूत्वाचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. या पार्श्वभूमीवर द्रविडी राजकारणाचा पाया मजबूत असलेल्या राज्यात भाजपचे ‘कमळ’ फुलणार का, की नेहमीप्रमाणेच प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व कायम राहणार याची उत्सुकता आहे.
हेही वाचा >>> लोकशाहीच्या उत्सवात राजकीय रंगांची उधळण
विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणा अधिक सक्रिय होतात, असा विरोधकांचा आरोप आहे. तमिळनाडूत ईडीचे अटकसत्र सुरू झाले आहे. द्रमुकच्या मंत्र्याला अटक झाली. याशिवाय मुख्यमंत्री स्टॅलिन यांना राज्यपाल रवि यांच्याशी दोन हात करावे लागत आहे. विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल संमती देत नसल्याने द्रमुक सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. अगदी चारच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात एकाच्या शपथविधीवरून तमिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. यावर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी काम करणे अपेक्षित असल्याचे कान टोचल्यावर राज्यपालांपुढे पर्याय शिल्लक राहिला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत जयललिता यांच्या पश्चात कमकुवत झालेला अण्णा द्रमुक पक्ष सत्तेत होता आणि तेव्हा राज्यातील ३९ पैकी ३८ जागा द्रमुक-काँग्रेस आघाडीने जिंकल्या होत्या. दोन वर्षांने झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला सत्ता मिळाली, पण कोयंबतूर, सेलम, नामक्कल या पश्चिम तमिळनाडूत अण्णा द्रमुकने आपले वर्चस्व कायम राखले होते. स्टॅलिन सरकारला तीन वर्षे लवकरच पूर्ण होतील आणि या सरकारच्या कारभाराबद्दल जनमत लोकसभा निवडणुकीच्या निकालात समजू शकेल. भाजपने अण्णा द्रमुकच्या पारंपरिक मतांवर लक्ष केंद्रित केले आहे.
दक्षिणेत यशासाठी प्रयत्न
तमिळनाडूत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: लक्ष घातले आहे. वाराणसी किंवा गुजरातमध्ये तमिळ संगम कार्यक्रम आयोजित करणे, लोकसभेत चोला संस्कृतीशी निगडित राजदंड बसविणे, नवीन संसद इमारतीच्या उद्घाटनाला तमिळ पुरोहितांना निमंत्रित करणे, तमिळ भाषेच्या विकासाला प्रोत्साहन देणे, तमिळनाडूत केंद्राच्या विविध योजना राबविणे व त्यासाठी मोठया प्रमाणावर निधीची तरतूद करून भाजपने तमिळनाडूत हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला आहे. ‘डेंग्यू, हिवताप, करोनाप्रमाणे सनातन धर्माचा नायनाट केला पहिजे या स्टॅलिनपुत्र उदयनिधी यांच्या विधानावर भाजपने देशभर काहूर माजविले. १९९८च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेपूर्वी कोईम्बतूर शहरात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर भाजपने अण्णा द्रमुक आघाडीत तीन जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपने मात्र सारी ताकद पणाला लावून तमिळनाडूत यश संपादन करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि माजी आय.पी.एस. अधिकारी के. अन्नामलाई, तमिळसाई सुंदरराजन आदी बडया नेत्यांना रिंगणात उतरविले आहे.
अण्णा द्रमुकच्या कामगिरीकडे लक्ष्य
अण्णा द्रमुकचा जनाधार कायम राहतो का, यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत. पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्यातील वादात पक्षाचे आधीच नुकसान झाले आहे. विधानसभा निवडणुकीत ३० टक्क्यांच्या आसपास मते मिळालेल्या अण्णा द्रमुकची मते कायम राहतात की भाजपकडे हस्तांतरित होतात यावर भाजपचे यश अवलंबून असेल. तिरंगी लढतीत द्रमुकचे निवडणूक चिन्ह ‘उगवता सूर्य’मधील सूर्य तळपतो, भाजपचे ‘कमळ’ फुलते की अण्णा द्रमुकचे ‘दोन पाने’ चिन्हांमधील पाने बंद होतात का, यावरच सारे अवलंबून आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांची लोकसभा निवडणुकीत खरी कसोटी आहे.
अर्ज भरतानाच संघर्ष
चेन्नई : तमिळनाडूत गेली पाच दशके द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक असा संघर्ष सुरू आहे. त्याचे प्रत्यंतर उमेदवारी अर्ज भरतानाच आले. चेन्नई उत्तर मतदारसंघात तमिळनाडूचे मंत्री पी के शेखर बाबू आणि अण्णा द्रमुकचे नेते डी. जयकुमार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्याच पक्षाचा अर्ज आधी भरला जावा यासाठी गळ घातली. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झडली. रोयापुरम मानो अण्णा द्रमुकचे आणि कलानिधी वीरस्वामी द्रमुकचे उमेदवार आहेत.
२०१९ चा निकाल
एकूण
जागा ३९
द्रमुक २४
काँग्रेस ८
माकप २
भाकप २
व्हीसीके १
मुस्लीम लीग १
अण्णा द्रमुक १