नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ५९.०६ टक्के मतदान झाले. या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. पश्चिम बंगालमधील तुरळक हिंसाचार आणि ओदिशातील मतदान यंत्रातील कथित बिघाड-गोंधळ वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले.
महाराष्ट्रात सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वाधिक ७३.१४ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले. अन्य राज्यांपैकी बिहारमध्ये ५२.७८ टक्के, जम्मू-काश्मीर ५४.२१ टक्के, झारखंड ६३.०६ टक्के, ओदिशा ६२.२३ टक्के, उत्तर प्रदेश ५७.७९ टक्के आणि लडाख ६८.४७ टक्के मतदानाची नोंद झाली.
निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या रात्री १० पर्यंतच्या आकडेवारीनुसार अंदाजे ५९.०६ टक्के मतदान झाले.
उत्तर प्रदेशातील एका गावातील मतदान केंद्रावर मतदानयंत्रांत बिघाड झाल्याचा दावा काँग्रेसने केला. तसेच बेला खरा गावातील तीन मतदान केंद्रांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोपही काँग्रेसने केला. ओडिशात रिक्षातून मतदारांना घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीची अनोळखी मारेकऱ्यांनी हत्या केली.
हेही वाचा >>> भाजपचे चीनशी संबंध; काँग्रेसचा आरोप, पंतप्रधान मोदींनी उत्तर देण्याची मागणी
३७९ मतदारसंघांतील प्रक्रिया पूर्ण
पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यामुळे आतापर्यंत २३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ३७९ मतदारसंघांतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या टप्प्यात आठ कोटी ९५ लाख मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यात चार कोटी २६ लाख महिला आणि ५,४०९ तृतीय पंथीयांचा समावेश होता. मतदानासाठी ९४,७३२ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.
तृणमूलभाजप चकमकी
पश्चिम बंगालमधील सात मतदारसंघांमध्ये हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडले. बराकपूर, बोनगाव आणि आरामबाग मतदारसंघांत तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात चकमकी झडल्या. केंद्रीय सुरक्षा दलांच्या जवानांनी हुगळीच्या काही मतदान केंद्रांवर मतदारांना धमकावल्याचा आरोप करीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी निदर्शने केली.
हजाराहून अधिक तक्रारी
अनेक राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या असून त्यांची संख्या १,०३६ आहे. मतदान यंत्रांमधील बिघाड आणि निवडणूक प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर प्रवेशास मनाई करणे आदी तक्रारींचा प्रामुख्याने समावेश आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.