हृषिकेश देशपांडे
मध्य प्रदेशात नेहमीच भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सामना होतो. यंदाही तेच चित्र आहे. मात्र चार महिन्यांपूर्वी राज्यात पुन्हा मोठया मताधिक्याने भाजप सत्तेत आल्याने काँग्रेसपुढे अडचणी निर्माण झाल्यात. पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, भाजपला राज्यात आव्हान कसे देणार? ही चिंता पक्षापुढे आहे. राज्यातील लोकसभेच्या २९ जागांपैकी गेल्या वेळी २८ जागा भाजपने जिंकल्या होत्या. छिंदवाडा या माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या प्रभावक्षेत्रातील जागा काँग्रेसला राखता आली. कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ येथून विजयी झाले होते. यंदा ही जागा जिंकण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. डिसेंबरमध्ये भाजपने राज्यात पुन्हा सत्ता आल्यावर शिवराजसिंह चौहान यांच्या ऐवजी मोहन यादव यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. त्यामुळे यादव यांच्यापुढे चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान आहे. मध्य प्रदेशात भाजपचे संघटन जनसंघापासून उत्तम आहे. केंद्र व राज्य सरकारची कामगिरी याच्या जोरावर भाजप निवडणुकीला सामोरे जात आहे. भाववाढ, बेरोजगारी हे मुद्दे काँग्रेसने केंद्रस्थानी आणले आहेत. याखेरीज खासदारांना विकासकामे करता आली नसल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कमलनाथ तसेच दिग्विजय सिंह या ज्येष्ठ नेत्यांच्यावरच काँग्रेसची सारी मदार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जितू पटवारी यांची ही पहिलीच निवडणूक. काँग्रेसने चार ते पाच जागा जरी जिंकल्या तरी ती मोठी गोष्ट ठरेल असे सध्याचे चित्र आहे. राज्यात पुन्हा भाजप सत्तेत आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. यात आता सामान्य कार्यकर्त्यांला भाजपशी संघर्ष करावा लागेल.
हेही वाचा >>> “पंतप्रधान मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; निवडणुकीआधी आमच्या दोन खेळाडूंना…”; राहुल गांधींचा गंभीर आरोप
लक्ष्यवेधी लढती
गुणा मतदारसंघात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपकडून रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत शिंदे पराभूत झाले होते. यंदा त्यांचा सामना काँग्रेसच्या यादवेंद्र यादव यांच्याशी आहे. यादव हे पूर्वी भाजपमध्ये होते. पक्षबदल केलेल्या दोन व्यक्तींमध्ये ही लढत आहे. छिंदवाडामध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे रिंगणात आहेत. काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची आहे. भाजपने सात दशकांत केवळ १९९७ मध्ये ही जागा जिंकली आहे. याखेरीज राघोगड मतदारसंघातून ७७ वर्षीय दिग्विजय सिंह मैदानात आहेत. काँग्रेसच्या बहुसंख्य ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला असताना दिग्विजय सिंह यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोळा हजार कार्यकर्ते भाजपमध्ये?
भाजपचे नेते व माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील तीन सदस्यीय समितीने काँग्रेसच्या नेत्या कार्यकर्त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. राज्यातील ५५ जिल्ह्यांपैकी ३४ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. शाजापूर येथे अडीच हजार तर छिंदवाडा येथे दोन हजारावर कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याचा दावा केला जात आहे. हे दोन्ही काँग्रेसचे प्रभाव असलेले आहेत. अर्थात काँग्रेसने मात्र संधीसाधू लोक पक्षाबाहेर जात असल्याने चिंता करण्याचे कारण नसल्याचे नमूद केले आहे. माजी खासदार सुरेश पचौरी यांच्यापासून ते माजी महापौर, नगरसेवक असे अनेक जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभेत हे आव्हान कसे पेलणार ही चिंता आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आगर माळवा जिल्ह्यातील सुसनेर येथे माँ बगलामुखी माता मंदिरात रविवारी यज्ञ केला.
२०१९ चा निकाल
एकूण जागा २९
भाजप २८ काँग्रेस १