जागावाटप.. उमेदवारांची यादी.. घोषणांचा धडाका.. फायलींचा निपटारा.. विकासकामांचे भूमिपूजन.. पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा.. आचारसंहितेच्या धसक्याने राजकीय पक्षांची सुरू असलेली ही धावपळ थांबून खऱ्या अर्थाने ‘सत्ताबाजारा’ला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकांचा बिगुल याच आठवडय़ात वाजण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होऊन सात टप्प्यांत निवडणूक पार पाडली जाण्याची दाट शक्यता आहे.
१५व्या लोकसभेची मुदत १ जून रोजी संपत असून, त्याआधी ३१ मेपर्यंत नवीन लोकसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्याच्या हालचाली केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केल्या आहेत. यासंदर्भातील सर्व पूर्वतयारी झाली असून, चालू आठवडय़ाच्या मध्यातच निवडणुकांची घोषणा होण्याचे संकेत आयोगाकडून मिळाले आहेत. ७ ते १० एप्रिल या कालावधीत निवडणुकांना सुरुवात होऊन सात टप्प्यांत देशभरात मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रथमच सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. याआधी २००९ मधील निवडणुका पाच टप्प्यांत घेतल्या गेल्या होत्या.
पेपर ट्रेलचा प्रयोग
मतदान केल्याची पावती मतदारांना देण्यात येणार आहे. या पद्धतीला ‘पेपर ट्रेल’ असे म्हटले जाते. कोणत्याही मतदारसंघात उमेदवाराच्या निवडीविषयी वाद उद्भवल्यास त्यासाठीचा पुरावा न्यायालयात सादर करण्यासाठी या पेपर ट्रेलचा वापर केला जाणार आहे. निवडक मतदारसंघातच  ‘पेपर ट्रेल’चा प्रयोग केला जाणार आहे.  लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश, नव्याने निर्माण करण्यात आलेले तेलंगण, ओदिशा व सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार आहेत.
पूर्वतयारी..
खंडप्राय देशात
लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण पूर्वतयारी केली आहे.
एकूण मतदार
८१ कोटी (२००९ मध्ये ७१. ४०कोटी)
मतदानयंत्रे
१२ लाख (अधिक अडीच लाख नवीन मतदानयंत्रे)
निवडणूक कर्मचारी : एक कोटी दहा
लाख (त्यातील निम्मे सुरक्षारक्षक)
उमेदवारांची खर्चमर्यादा  : ७० लाख रुपये
पहिला टप्पा धोक्याचा?
मतदानाचा पहिला टप्पा नक्षलग्रस्त राज्ये व ईशान्येकडील राज्यांत घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पहिला टप्पा धोकादायक ठरण्याची चिन्हे आहे.
आठ लाख मतदानकेंद्रे
मतदारांची संख्या पाहता देशभरात आठ लाख मतदानकेंद्रे उभारली जाण्याची शक्यता आहे. मतदारांना मतदानासाठी घरापासून फारसे लांब जावे लागू नये यासाठी मतदानकेंद्रांची संख्या यंदा जास्त ठेवली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Story img Loader