लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांना तुफान यश मिळाले. भाजप युती (NDA) एकूण ३०० हून अधिक जागांवर विजयी झाली. महाराष्ट्रातही भाजप शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेले ओम राजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेले राणा जगजीतसिंह पाटील यांना मोठ्या फरकाने पराभूत केले.
उस्मानाबादमधील अंतिम निकालात एकूण १२ लाख ४ हजार ३७० मतांची मोजणी करण्यात आली. त्यात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना ५ लाख ९६ हजार ६४० मते मिळाली, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेले राणा जगजीतसिंह पाटील यांना कांटे की टक्कर देता आली नाही. त्यांना एकूण ४ लाख ६९ हजार ७४ मतांवर समाधान मानावे लागले. तर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांना केवळ ९८ हजार ५७९ मते मिळाली. या मतदारसंघात तब्बल १० हजार २४ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दर्शवली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना १ लाख २७ हजार ५६६ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
२०१४ साली झालेल्या निवडणुकीत सेनेचे रविन्द्र गायकवाड यांना येथून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी २ लाख ३४ हजार ३२५ मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. पण यंदा पक्षांतर्गत गटबाजी आणि कामगिरीचा अभाव यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे बोलले जात होते. त्या जागी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी सेनेचा गड कायम राखला मात्र विजयाचे अंतर मात्र काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.