१०८ कोटींची मालमत्ता २.२० कोटींवर
मुंबई : भाजप खासदार पूनम महाजन यांची २०१४ मध्ये १०८ कोटी रुपयांची असलेली मालमत्ता २०१९ मध्ये दोन कोटी २० लाखांवर आली आहे. त्यांच्याकडे स्वतच्या मालकीचे घर, जमीनजुमला, सोने काहीही नसल्याचे महाजन यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
महाजन यांच्याविरुद्ध धनादेश न वटल्याचे प्रकरण न्यायालयात आहे. गेल्या निवडणुकीत मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेल्या महाजन यांना भाजप राजवटीत खासदारकीच्या काळात ‘बुरे दिन’ आल्याची चर्चा आहे.
महाजन यांनी उत्तरमध्य मुंबईतून भाजपतर्फे शुक्रवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी सिद्धिविनायक, माऊंटमेरी, माहीम दर्गा येथे जाऊन आशीर्वाद घेतले. महाजन यांनी २००९ मध्ये घाटकोपरमधून विधानसभा निवडणूक लढविताना २० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, तर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी १०८ कोटी रुपयांची स्वत व पतीची मालमत्ता असल्याचे आणि ४१ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज किंवा देणी असल्याचे जाहीर केले होते. तर २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविताना सुमारे २० कोटी रुपयांची कुटुंबाची मालमत्ता जाहीर केली होती. मात्र खासदारकीच्या कारकीर्दीत त्यांची मालमत्ता व उत्पन्न कमी झाले असून २०१९ मध्ये महाजन यांनी स्वतकडे एक कोटी सहा लाख तर पती वजेंडला राव यांच्याकडे एक कोटी १४ लाख रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. रोख रक्कम, मुदतठेवी, कंपन्यांचे समभाग आदी सर्व जंगम मालमत्ता यात गृहीत धरण्यात आली आहे. सध्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘सिग्नेचर आर्यलड’ इमारतीत राहत असलेल्या महाजन यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावे घर, शेतजमीन, सोने काहीही नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर आता कोणतेही कर्ज किंवा दायित्व नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
महाजन यांच्या स्वतच्या २६.२४ कोटी रुपये विमा कवच (सम अॅश्युअर्ड) असलेल्या तर पतीच्या नावे ५०.८८ कोटी रुपये विमा कवच असलेल्या विविध कंपन्यांच्या विमा पॉलिसी आहेत.
महाजन व त्यांचे पती वजेंडला राव यांनी २०१४ पासून २०१८ पर्यंत प्राप्तीकर विवरणपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न ६९.४४ लाख रुपयांवरून सुमारे १० लाख रुपयांपर्यंत तर पतीचे वार्षिक उत्पन्न १.७२ कोटी रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत घसरले आहे.