भारतीय जनता पार्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील ४० पैकी ३२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच भाजपा राज्यातील २०२५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देखील जाहीर करेल. अशी माहिती इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपचा विश्वासघात केला,’’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला. तसेच, ‘‘बिहारमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पूर्णिया येथील पक्ष मेळाव्यात शहा म्हणाले, की “नितीशकुमार यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. म्हणून त्यांनी जातीपातीच्या राजकारणासाठी समाजवादाचा त्याग केला. त्यांनी २०१४ मध्ये असेच केले होते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारची जनता या महाआघाडीचा पाडाव करेल. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप बिहारमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. आमचा स्वार्थ आणि सत्तेपेक्षा सेवा आणि विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे. नितीशकुमार यांनी पंतप्रधान होण्याच्या हव्यासापोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आता ते राजद आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.”
ऑगस्टमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नऊ वर्षांत दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) संबंध तोडले आणि महाआघाडीशी हातमिळवणी केली. विशेष म्हणजे २०१७ मध्ये, त्यांनी एनडीएमध्ये परतण्यासाठी लालू-प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला डावलले होते.
भाजपा जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप करत नितीश कुमारांनी युती तोडली आणि राजदसमवेत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून नितीश कुमार सातत्याने भाजपावर टीकास्त्र सोडत आहेत. शिवाय, मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांची एकजुट करण्यासाठी देखील प्रयत्नशील आहेत.