लोकसत्ता निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात शनिवारी मतदान होत आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंह ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. आज मतदान संपणार असल्याने सर्वांच्या नजरा शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांवर व ४ जूनला लागणाऱ्या निकालांवर असतील.
अखेरच्या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३, हिमाचल प्रदेशातील सर्व चार, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा, झारखंड व चंदीगडमधील प्रत्येकी तीन जागांवर मतदान होणार आहे. ओडिशाच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार असून हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे.
हेही वाचा >>> शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मनमोहन सिंग यांचे जनतेला उद्देशून पत्र; म्हणाले, “लोकशाही वाचवण्यासाठी…”
शनिवारी एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. बसपाने सर्वाधिक ५६ उमेदवार उभे केले आहेत, त्यापाठोपाठ भाजपने ५१ आणि काँग्रेसने ३१ उमेदवार उभे केले आहेत. संपूर्ण पंजाबमधील मतदानासह, राज्यात या टप्प्यात सर्वाधिक ३२८ उमेदवार आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशातील १३ जागांसाठी १४४ उमेदवार आहेत. बिहारमध्ये ८ जागांसाठी १३४, तर पश्चिम बंगालमध्ये ९ जागांसाठी १२४ उमेदवार आहेत.
उकाडा किंवा पावसाचा मतदानावर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
मतदानोत्तर चाचणी चर्चेपासून काँग्रेस दूर
नवी दिल्ली : काँग्रेसने दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कोणत्याही लोकसभा मतदानोत्तर चाचणी चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरपीसाठी अनुमान लावत चढाओढ निर्माण करण्यात काँग्रेस सहभागी होऊ इच्छित नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी म्हटले आहे. ‘‘कोणत्याही चर्चेचा उद्देश लोकांना माहिती देणे हा असावा. आम्ही ४ जूनपासून चर्चेत आनंदाने भाग घेऊ,’’ असे खेरा यांनी म्हटले आहे.
महत्त्वाचे उमेदवार
नरेंद्र मोदी, भाजप (वाराणसी, उत्तर प्रदेश)
अनुराग ठाकूर, भाजप (हमीरपूर, हिमाचल प्रदेश)
अभिषेक बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस (डायमंड हार्बर, प. बंगाल)
कंगना राणावत, भाजप (मंडी, हिमाचल प्रदेश)
विक्रमादित्य सिंह, काँग्रेस (मंडी, हिमाचल प्रदेश)
आनंद शर्मा, काँग्रेस (कांगडा, हिमाचल प्रदेश)
मीसा भारती, राजद (पाटलीपुत्र, बिहार)