बारासात (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. ‘मत जिहाद’ला प्रोत्साहन देण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) तरुणांचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप बारासात येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांनी केला.
हेही वाचा >>> “रविवारची सुट्टी ख्रिश्चनांमुळे मिळाली, पण आता शुक्रवार…”, पंतप्रधान मोदींची झारखंडमध्ये टीका
मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले, ‘‘तृणमूलने बंगालमधील ओबीसींशी केलेला विश्वासघात न्यायालयाने उघड केला आहे. ७७ मुस्लीम जातींना ओबीसी म्हणून घोषित करणे बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच मत जिहादींना मदत करण्यासाठी तृणमूलने लाखो ओबीसी तरुणांचे हक्क रातोरात लुटले. तृणमूलने राज्यातील ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले, ‘‘येथील न्यायाधीशांच्या हेतूवर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मला तृणमूलच्या लोकांना विचारायचे आहे की, ते आता न्यायाधीशांच्या मागेही त्यांचे गुंड सोडतील का? तृणमूल बंगालमधील न्यायव्यवस्थेचा कसा गळा घोटत आहे याकडे संपूर्ण देश पाहत आहे.’’
© The Indian Express (P) Ltd