निमा पाटील
तेलंगण म्हणजे देशामध्ये आर्थिकदृष्टय़ा आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी एक राज्य. लोकसभा निवडणुकीत येथील परिस्थितीचे वर्णन करायचे झाल्यास, देशातील काँग्रेसला सर्वाधिक अनुकूल असे करावे लागेल. त्यापाठोपाठ दक्षिणेमधील आपली आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपलाही आपल्या झोळीत एखाद-दुसरी अधिकची जागा मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे यंदा इथे तिरंगी लढत होत आहे. त्याच वेळी वर्षभरापूर्वी अतिशय ताकदवान असलेला भारत राष्ट्र समिती पक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीत तिसरे स्थान मिळेल असा अंदाज राजकीय पंडित व्यक्त करत आहेत. येथे मतदान एकाच टप्प्यात, १३ मे रोजी होणार आहे.
वर्षभरापूर्वी या राज्यातील परिस्थिती बीआरएस आणि के सी राव यांच्यासाठी सर्वार्थाने अनुकूल असल्याचे चित्र होते. मात्र, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले घवघवीत यश आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाढलेला उत्साह आणि ए रेवंत रेड्डी यांची मेहनत व नेतृत्व यामुळे तेथील विधानसभा निवडणूक जिंकण्यात काँग्रेसला यश आले. हे वातावरण लोकसभा निवडणुकीदरम्यानही कायम राहून तिथे काँग्रेसला चांगली कामगिरी बजावण्याची आशा आहे.
मागील निवडणुकीचा तक्ता बघायचे तर, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये बीआरएसने सर्वाधिक नऊ, भाजपला चार आणि काँग्रेसने तीन जागा जिंकल्या होत्या. असादुद्दीन ओवौसी यांच्या ‘एआयएमआयएम’ने हैदराबादचा गड कायम राखला होता. यंदा राज्यातील १७ जागांपैकी १४ जागांचे लक्ष्य ठेवले असल्याचे रेवंत रेड्डी वारंवार सांगत आहेत. तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजपसाठी १२ जागांचे लक्ष्य ठेवले आहे.
काँग्रेसच्या योजना
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मोठय़ा प्रमाणात हमी जाहीर केल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर त्यांची अंमलबजावणीही सुरू केली. त्याचा फायदा लोकसभेत होण्याची त्यांना अपेक्षा आहे. शपथविधीनंतर ४८ तासांच्या आत रेवंत रेड्डी यांनी त्यामध्ये सरकारी परिवहन महामंडळाच्या बसमधून महिलांना मोफत प्रवास, गरिबांसाठी १० लाख रुपयांची राजीव आरोग्यश्री आरोग्य योजना या दोन महत्त्वाच्या योजना सुरू केल्या. २८ हजारांपेक्षा सरकारी नोकरभरती आणि जातनिहाय जातीगणना याही योजना सुरू करण्यात आल्या.
तेलंगणमध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. काँग्रेस व भाजप यांच्यात प्रमुख सामना आहे. त्याच वेळी वर्षभरापूर्वी ताकदवान असलेला भारत राष्ट्र समितीला सत्ता गेल्याने फटका बसण्याची चिन्हे आहेत.
भाजपची मदार मोदींवर
कर्नाटकनंतर भाजपसाठी तेलंगण हे दक्षिणेत महत्त्वाचे राज्य आहे. शेजारच्या तमिळनाडूमध्येही भाजप प्रयत्न करत असला तरी तिथे आतापर्यंतयश मिळालेले नाही. त्यामानाने तेलंगणामधील स्थिती भाजपसाठी अधिक आश्वासक आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणात हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली तसेच १५ मार्चला रोड शोही केला. मोदींच्या हमी आणि लोकप्रियता याचा फायदा होईल असा भाजपचा हिशेब आहे. याच्या जोडीला राम मंदिराचाही मुद्दा आहेच. विधानसभा निवडणुकीत भाजपला आठ जागा आणि १४ टक्के मते मिळाली आहेत.
बीआरएसचे बिघडले कुठे?
सलग १० वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत काहीशा अनपेक्षितपणे झालेला पराभव पक्षप्रमुख के सी राव यांच्या जिव्हारी लागला. त्यातच निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर करण्याच्या आदल्या दिवशी ईडीने दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात त्यांची मुलगी व आमदार के कविता यांना अटक केली. यामुळे राव आणि पर्यायाने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य चांगलेच खचले आहे. पक्षाचे अनेक नेते राजीनामे देऊन काँग्रेस आणि भाजपमध्ये सहभागी होत आहेत.
हैदराबाद येथे काँग्रेस नेते राहुल गांधी व मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी प्रचार सभेत पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
२०१९ मधील राजकीय चित्र
एकूण जागा – १७
बीआरएस – ९
भाजप – ४
काँग्रेस – ३
एमआयएम -१