नवी दिल्ली : संविधान धोक्यात आल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसला संपूर्णपणे बेसावध गाठून केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत आणीबाणीचा निषेध करणारा प्रस्ताव आणला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा प्रस्ताव मांडून आणीबाणीविरोधी लढ्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यासही सदस्यांना सांगितले. भाजपने ‘गुगली’ टाकून डाव उलटविल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधकांनी याविरोधात घोषणाबाजी केली. गदारोळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांचे अभिनंदन करताना संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांची असल्याची आठवण करून दिली होती. मात्र अभिनंदनाचा प्रस्ताव आणि पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाचा परिचय करू दिल्यानंतर बिर्ला यांनीच अचानक आणीबाणीचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला. ‘‘आणीबाणीच्या काळ्या दिवसांचे हे ५० वे वर्ष आहे. आणीबाणीने देशातील अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, कित्येकांचा मृत्यू झाला. काँग्रेसच्या हुकूमशाही सरकारच्या हातून प्राण गमावलेल्या कर्तव्यदक्ष व देशभक्त नागरिकांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळू या’’, असे आवाहन बिर्ला यांनी केले. त्यावर सत्ताधारी बाकांवरील सदस्य दोन मिनिटे स्तब्ध उभे राहिले. तत्पूर्वी सुमारे १० मिनिटांच्या प्रस्तावात बिर्ला यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. २५ जून १९७५ मध्ये आणीबाणी लादण्याच्या निर्णयाचा हे सभागृह तीव्र निषेध करते. ज्यांनी आणीबाणीला विरोध केला, लढा दिला आणि भारताच्या लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली त्या सर्व लोकांच्या निर्धाराचे आम्ही कौतुक करतो, असे बिर्ला म्हणाले. ‘‘आणीबाणी लागू झाल्यानंतर तत्कालीन मंत्रिमंडळाने निर्णयाला मान्यता दिली होती. अगणित बलिदानानंतर मिळालेल्या या दुसऱ्या स्वातंत्र्याचा पुनरुच्चार करण्यासाठी संसदेमध्ये ठराव मंजूर करणे गरजेचे आहे’’, असे प्रस्तावामागील कारण बिर्लांनी दिले. ‘‘भारतात लोकशाही मूल्ये आणि वादविवादाला नेहमीच पाठिंबा दिला गेला आहे. अशा देशावर इंदिरा गांधींनी हुकूमशाही लादली. भारतातील लोकशाही मूल्ये चिरडली गेली आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला गेला’’, अशी टीका लोकसभाध्यक्षांनी केली.

हेही वाचा >>> ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी; आतापर्यंत कोणी-कोणी भूषवलं लोकसभेचं अध्यक्षपद? जाणून घ्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. तर कोंडी झालेल्या काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रस्तावावर चर्चा व्हायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकसभाध्यक्षांचे अभिनंदन करताना विरोधी पक्षांनी निष्पक्ष कारभाराची अपेक्षा बाळगली होती. पण, लोकसभाध्यक्षांनी सभागृहात चर्चा न झालेला मुद्दा उपस्थित केला व त्यामुळे संघर्ष निर्माण झाल्याची टीका थरूर यांनी केली.

 ‘इंडिया’तील मतभेद चव्हाट्यावर – भाजप

लोकसभाध्यक्षांनी आणलेल्या आणीबाणी निषेध प्रस्तावामुळे ‘इंडिया’ आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याची टीका भाजपने केली. प्रस्ताव मांडला जात असताना काँग्रेसचे सदस्य मोकळ्या जागेत उभे राहून घोषणाबाजी करीत होते. मात्र समाजवादी पक्ष, द्रमुक, तृणमूल सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही, असा दावा भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. आणीबाणीशी लढा देताना प्राण गमाविलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही ‘इंडिया’ आघाडीतील या पक्षांचे सदस्य उभे राहिले, त्यामुळे नाइलाजाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही उभे राहावे लागले, असेही पात्रा यांचे म्हणणे आहे.

सत्ताधारी खासदार संसदेच्या पायऱ्यांवर

लोकसभा तहकूब झाल्यानंतर भाजप व रालोआतील घटक पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आणीबाणीचा निषेध करणारे फलक दाखवत निदर्शने केली. आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण असल्याने त्याची माहिती लोकांना करून देण्याची गरज आहे. त्यातून तरुण पिढीला लोकशाहीची जाणीव होईल व संविधानाचे महत्त्व समजेल, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. विरोधकांनी संविधानावरून भाजप व केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्ना सुरू ठेवला असताना त्याला आणीबाणीच्या मुद्द्याने प्रत्युत्तर देण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती यामुळे स्पष्ट झाली आहे.

आणीबाणीच्या मुद्द्यावर सभागृहात लोकसभाध्यक्षांनी चर्चा करण्याची संधी द्यायला हवी होती. त्यानंतर सभागृह निष्कर्षापर्यंत पोहोचले असते पण, त्याआधीच लोकसभाध्यक्षांनी निष्कर्ष सभागृहावर लादला.

शशी थरूरखासदार, काँग्रेस</p>

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली. हा देशाच्या इतिहासातील काळा डाग आहे. आणीबाणी लागू करून इंदिरा गांधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरच हल्ला केला होता.

ओम बिर्लालोकसभाध्यक्ष

माननीय लोकसभाध्यक्षांनी तीव्र शब्दांत आणीबाणीचा निषेध केला आणि तेव्हा झालेले अत्याचार तसेच लोकशाही पायदळी कशी तुडविली गेली हे अधोरेखित केले. यासाठी मी त्यांचा आभारी आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान