नवी दिल्ली : लोकसभेच्या नवनियुक्त खासदार व अभिनेत्री कंगना राणावत यांची सोमवारी महाराष्ट्र सदनातील भेट वादात सापडली.
तात्पुरत्या निवासासाठी खोल्यांची पाहणी करण्यासाठी राणावत सदनात आल्या होत्या. पण तिथे त्यांनी मुख्यमंत्री कक्षाची मागणी केल्याची चर्चा रंगली. त्यावर शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी ट्वीट करून राणावत यांच्यावर टीका केल्याने नवा वाद निर्माण झाला.
मात्र, राणावत यांनी मुख्यमंत्री कक्षाची निवासासाठी कोणतीही मागणी केलेली नव्हती. सदनामध्ये येऊन राणावत यांनी खोल्यांची पाहणी केली. त्यांना पसंत असेल तर त्या सदनात राहू शकतात, असे सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार (राजशिष्टाचार व सुरक्षा) यांनी स्पष्ट केले.
यंदा लोकसभेमध्ये नव्या खासदारांची संख्या जास्त असल्याने त्यांना कायमस्वरूपी निवास उपलब्ध होईपर्यंत विविध राज्यांच्या सदन व भवनांमध्ये रहावे लागणार आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये निवासाची उत्तम सुविधा असल्याने इतर राज्यांतील खासदारही इथे राहण्यास उत्सुक असतात. राणावत हिमाचल प्रदेशातील मंडीच्या खासदार असल्या तरी तिथे योग्य सुविधेचा अभाव असल्याने त्यांनी महाराष्ट्र सदनात राहण्याच्या दृष्टीने सोमवारी सदनाला भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा >>> संविधानावरून रणकंदन; ‘आणीबाणी’ची आठवण काढत पंतप्रधानांचे प्रत्युत्तर, राज्यघटनेची प्रत घेऊन विरोधक संसदभवनात
राणावत यांना सदनातील खोल्या फारशा पसंत पडल्या नाहीत. त्यामुळे फक्त पाहणी करून त्या निघून गेल्या. मात्र, त्यापूर्वी त्यांनी राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला फोनवरून मुख्यमंत्री कक्षासंदर्भात विचारणा केली अशी चर्चा रंगली होती. राजशिष्टाचाराचे पालन करावे लागते व हा कक्ष इतरांना देता येत नाही असे राणावत यांना स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.
राऊत यांचा टोला
राणावत यांच्या सदनातील भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून टीका केली. बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचलभवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही.
महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी…, असा टोमणा राऊत यांनी लगावला.