मनीषा देवणे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंध्र प्रदेशात तेलगु देशम पक्ष (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस या प्रादेशिक पक्षांचेच प्राबल्य आहे. लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. लोकसभेआधी टीडीपीशी भाजप युती करणार अशी खूप दिवस चर्चा होती, पण भाजप कुठलीही भूमिका घेईना तेव्हा टीडीपीच्या एन. चंद्राबाबू नायडू यांनी अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेनेशी (जेएसपी) युतीची घोषणा करून जागावाटपही केले. राज्यात प्राबल्य असलेल्या कम्मा आणि कापू समुदायाचे हे पक्ष एकत्र येताहेत म्हटल्यावर भाजपने तेलगु देशमशी युती केली.

दुसरीकडे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केंद्रात त्यांनी भाजपला कधीही थेट विरोध केलेला नाही. त्यामुळे प्रचारात त्यांच्यावर कशी टीका करणार? हा मुद्दा आहे. त्यातच काँग्रेसने मात्र जगन रेड्डींच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या त्यांच्या बहिणीला वाय.एस. शर्मिला यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तेलंगणाप्रमाणे आंध्रात काँग्रेस चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा >>> ‘इंडिया’ची सभा राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी- काँग्रेस

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ तर विधानसभेच्या १७५ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेस पक्षाने २५ पैकी २२ जागांवर  विजय मिळवला होता. टीडीपीच्या खात्यात अवघ्या तीन जागा आल्या. जागावाटपात २५ पैकी १७ जागा टीडीपी, ६ भाजपा तर २ जागा जेएसपीकडे आहेत.  जगन मोहन रेड्डींची मदार रेड्डी समुदायाच्या मतांवर आहे. बहीण शर्मिलाचा विरोध आणि टीडीपी-जनसेनेचे आव्हान पेलत त्यांना सत्ता राखण्याचे कसब साधायचे आहे.

विशेष राज्याच्या दर्जाचा मुद्दा प्रलंबित

राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. प्रचाराच्या प्रमुख मुद्दयांपैकी हाही आहे. याच मुद्दयावर भाजप आणि टीडीपी यांच्यात वितुष्ट आले होते. विभाजित आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या राज्याला मागास म्हणून विषेश राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला भाजपने नकार दिल्याने टीडीपी दुखावला होता. राज्याला नंतर विशेष राज्याऐवजी विशेष आर्थिक सहकार्य देण्यात आले. वायएसआरसीपीने याचे खापर टीडीपीवर फोडले, पण जगन रेड्डी स्वत: मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा त्यांना मोदी सरकारवर दबाव आणता आलेला नाही, याकडे आता विरोधी टीडीपी मतदारांचे लक्ष वेधत आहे. भाजप सहाच जागा लढवत असला तरी सहापैकी चार उमेदवार टीडीपीतूनच आयात केलेले आहेत. एक उमेदवार आठवडयापूर्वी भाजपत आला आहे. केवळ भूपतीराजू श्रीनिवास वर्मा मूळ भाजपचेच आहेत.

बसयात्रा, पदयात्रांमधून प्रचाराचा धुरळा

मुख्यमंत्री रेड्डी यांनी मेमंता सिद्धमह्ण म्हणजेच आम्ही तयार आहोतह्ण या संकल्पनेवर २१ दिवसांची बसयात्रा काढली होती. ही यात्रा २६ पैकी २२ जिल्ह्यांमधून फिरली. रेड्डी यांना प्रत्युत्तर म्हणून चंद्राबाबूंच्या मुलाने एन. लोकेश यांनी युवा गलम पदयात्रा काढली. जनसेनेचे अध्यक्ष पवन कल्याण यांनीही पदयात्रा काढली होती.

भावा-बहिणींच्या भांडणात काँग्रेसची उडी

वाय. एस. शर्मिला वायएसआर तेलंगणा या पक्षाचे निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले. ही काँग्रेससाठी  जमेची बाजू आहे.  एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात त्यांनी प्रजा थेरपू बायबाय बाबू.. बसयात्रा काढली होती. याचा फायदा वायएसआर काँग्रेसला झाला आणि पक्ष बहुमताने सत्तेत आला. पण फेब्रुवारी २०२१ मध्ये राजकीय मतभेदाचे कारण पुढे करत शर्मिला भाऊ जगन रेड्डी यांच्याविरोधात उभ्या राहिल्या. २०१९ च्या विधानसभेत भावासाठी जोरदार प्रचार करून सत्तास्थापनेत मदत करणाऱ्या शर्मिलांनी स्वत:चा वेगळा पक्ष येथे काढण्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसमध्ये विलीन होऊन त्यांनी सर्वांनाच धक्का दिला.

जातीय समीकरण

आंध्रात रेड्डी, कम्मा आणि कापू या तीन जातींचे वर्चस्व मानले जाते. निवडणुकीची गणिते  या तीन जातींवरच आधारलेली असतात. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची रेड्डी समाजावर पकड आहे तर चंद्राबाबू नायडू यांचे राजकारण कम्मा समुदायाभोवती फिरते. अभिनेते पवन कल्याण यांचा पक्ष कापू समुदायाचे प्रतिनिधित्व करतो. 

प्रचाराचे प्रमुख मुद्दे

* राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी

* जगनमोहन रेड्डींवरील हल्ला

* वाय. एस. विवेकानंद रेड्डींची हत्या

* एन, चंद्राबाबू नायडूंवरील भ्रष्टाचाराचे खटले

२०१९ चा निकाल

एकूण – जागा २५

वायएसआरसीपी  २२

(४९.८९ टक्के मते)

टीडीपी – ०३ (४०.१९ टक्के मते)

(एकूण मतदार सुमारे ४.९ कोटी)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha polls bjp tdp form alliance in andhra pradesh to beat jagan mohan reddy zws