ललित मोदी प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधी पक्षात सुरू असलेल्या संघर्षांमुळे पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा कामकाजाविना संपला. सलग चौथ्या दिवशी भाजप व काँग्रेसमध्ये तोडगा न निघाल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवापर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेस व भाजपने माघार घेण्यास नकार दिल्याने कामकाजाचा खोळंबा झाला आहे.
लोकसभेचे कामकाज शुक्रवारी अवघ्या पंधरा मिनिटानंतर दिवसभरासाठी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी तहकूब केले. कामकाज सुरू होताच महाजन यांच्या आसनासमोर येत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजीस सुरुवात केली. राज्यसभेतही कामकाज तीनदा तहकूब झाले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. तर भाजपनेही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह व उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.