घोषणबाजी करून आणि गोंधळ घालून लोकसभेचे कामकाज तहकूब करायला लावण्याचा प्रयत्न करणाऱया विरोधकांना शुक्रवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खडेबोल सुनावले. तुम्ही कितीही गोंधळ घातला, तरी मी आज सभागृहाचे कामकाज तहकूब करणार नाही. संपूर्ण देश तुम्हाला बघतो आहे. त्यांनाही कळू दे तुम्ही काय करता आहात, असे त्यांनी कॉंग्रेसच्या गोंधळ घालणाऱया खासदारांना सांगितले. मात्र, यानंतरही विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी करणे सुरूच ठेवले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ललित मोदी आणि व्यापमं प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी घोषणाबाजी करीत कामकाज होऊ न देण्याचा पवित्रा घेतला आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सातत्याने तहकूब करण्यात येते आहे. शुक्रवारीही लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘प्रधानमंत्री जवाब दो…’, ‘वी वॉंट जस्टिस..’ अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. त्याचबरोबर कागदी फलकही झळकावण्यात आले. यावर सुमित्रा महाजन यांनी सभागृहात फलक दाखवणे चुकीचे असल्याचे सांगत सदस्यांना ते खाली घेण्यास सांगितले. त्याचबरोबर सभागृहातील ३०० हून अधिक सदस्यांना प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही गोंधळ घालून त्यांचा हक्क हिरावून घेत आहात. तुम्ही याचा फेरविचार करा, असे सांगत गोंधळ घालणाऱया सदस्यांना जागेवर परत जाण्याची सूचना केली. त्यानंतरही सदस्य ऐकण्याची मनःस्थितीत नसल्याचे पाहून त्यांनी तुम्ही कितीही गोंधळ घातला, तरी मी आज सभागृहाचे कामकाज तहकूब करणार नाही, असे सांगत कामकाज सुरूच ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा